‘नाळ २’ या चित्रपटामुळे सध्या नागराज मंजुळे चर्चेत होते. काहीच महिन्यांपूर्वी ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही झळकले. लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच नागराज सध्या अभिनयातही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. कायम हटके, वेगळे आणि डोक्याला खाद्य देणारे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक नागराज आहेत. आपल्या चित्रपटातून ते समाजाबद्दल, विषमतेबद्दल भाष्य करत असतात. याबरोबरच ते आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊ पहात असतात.
काही दिवसांपूर्वीच नागराज यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन अ न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यूट्यूबवरील या कार्यक्रमात अनुराग कश्यप, विशाल भारद्वाजपासून केके मेनन व पंकज त्रिपाठीसारख्या कित्येक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. याच कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपटक्षेत्रातील अनुभवाबद्दल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं. याबरोबरच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही भाष्य केलं ज्याची प्रचंड चर्चा झाली.
आणखी वाचा : किंग खानच्या ‘Dunki’ चं ‘Donkey Routes’ शी नेमकं कनेक्शन काय? अवैध स्थलांतरावर बेतलाय चित्रपट
मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक प्रश्न नागराज यांना विचारण्यात आला. फक्त शिवाजी महाराज म्हणणं आणि जबरदस्तीने छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लावणं याविषयी नागराज मंजुळे यांना प्रश्न विचारण्यात आला, याबरोबरच शिवाय महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं.
या प्रश्नाचं उत्तर देताना नागराज मंजुळे म्हणाले, “आदरापेक्षा प्रेम हे वरचढ असतं असं मी मानतो, आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात एकही अशी व्यक्ती सापडणार नाही जिच्या मनात शिवाजी महाराजांविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नाही. शिवाजी महाराज हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्यावर प्रत्येक जातीचे धर्माचे लोक तेवढंच प्रेम करतात. अर्थात काही लोक मुद्दाम त्यांची शिवभक्ती दाखवण्यासाठी असले प्रकार करतात, जे फार वाईट आहे. महाराज हे प्रत्येकासाठी त्यांच्या वडिलांप्रमाणेच आहेत. आम्ही त्यांना ‘शिव-बा’ अशी हाक मारतो, जसं ज्योतिबा. असे महापुरुष एखाद्या जातीपुरतेच मर्यादित नसतात ते सगळ्यांचा विचार करतात.”
पुढे नागराज म्हणाले, “माझ्या मनात शिवाजी महाराजांप्रती प्रचंड आदर आणि प्रेम आहे, आणि मला ही गोष्ट कुणीही शिकवायची गरज नाही. माझं त्यांच्याशी थेट नातं आहे. मी सदैव ही गोष्ट सांगत राहीन जर बाबासाहेब आंबेडकर हे माझे वडील आहेत तर शिवाजी महाराज हे माझे आजोबा आहेत.” याबरोबरच आंबेडकरवादी आणि जातीमुळे झालेल्या अपमानाबद्दलही नागराज मंजुळे यांनी या मुलाखतीमध्ये मनमोकळेपणे भाष्य केलं. येत्या ४ नोव्हेंबरला ही मुलाखत ‘द लल्लनटॉप’च्या साईट व युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल.