‘नाळ २’ या चित्रपटामुळे सध्या नागराज मंजुळे चर्चेत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही झळकले. लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच नागराज सध्या अभिनयातही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. कायम हटके, वेगळे आणि डोक्याला खाद्य देणारे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक नागराज आहेत. आपल्या चित्रपटातून ते समाजाबद्दल, विषमतेबद्दल भाष्य करत असतात.
नुकतंच नागराज यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन अ न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यूट्यूबवरील या कार्यक्रमात अनुराग कश्यप, विशाल भारद्वाजपासून केके मेनन व पंकज त्रिपाठीसारख्या कित्येक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. याच कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपटक्षेत्रातील अनुभवाबद्दल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं. याबरोबरच नागराजने या मुलाखतीमध्ये ‘सैराट’बद्दलही भाष्य केलं.
आणखी वाचा : ‘टायगर ३’च्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात; सकाळी लवकरच्या शोबद्दल नवी माहिती समोर
मुलाखतकार सौरभ द्विवेदी यांनी ‘सैराट’ व ‘धडक’ यांच्यामध्ये सैराट जास्त वरचढ आणि तोच चित्रपट पाहण्याचा सल्ला जेव्हा त्यांनी दिला. तेव्हा त्याबद्दल बोलताना नागराज म्हणाले, “सैराट एका अशा विषयावर भाष्य करतो जयाबद्दल आपण कधीच वाच्यताही करत नाही. हा भेदभाव आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतो पण आपण त्याकडे लक्ष देत नाही कारण आपल्या बाबतीत ते घडलेलं नसतं. फॅन्ड्रीच्या बाबतीतही असंच झालं. जेव्हा कोलंबियाच्या विद्यापीठा तो चित्रपट दाखवण्यात आला तेव्हा एक महिला मला येऊन म्हणाल्या की हा फारच जुना विषय तुम्ही यातून मांडला आहे.”
पुढे नागराज म्हणाले, “जेव्हा एखादी समस्या आपल्यापर्यंत पोहोचलेली नसते तेव्हा आपल्यासाठी ती समस्याच नसते. समाजात अशी बरीच लोक आढळतात आणि यामुळेच सैराटसारख्या विषयांना हात घालणं अधिक सोप्पं होतं.” याच मुलाखतीमध्ये नागराज यांनी अशा बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. आंबेडकरांचे विचार आणि स्वतःच्या जातीमुळे त्याचा झालेला अपमान याबद्दलही नागराज यांनी मोकळेपणाने भाष्य केलं.