दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा ‘घर बंदुक बिर्याणी’ चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर आता चित्रपट ओटीटीवर येणार आहे. नागराज यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, तसेच या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता.
चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती करण्यासोबतच नागराजला अभिनयाचीही आवड आहे. त्यांनी स्वतःच्या चित्रपटांमध्ये काही कॅमिओ केले आहेत. ‘घर बंदुक बिर्याणी’मध्ये त्यांनी इन्स्पेक्टर राया पाटीलची भूमिका केली होती. “मला अभिनय आवडतो आणि जेव्हा मी अभिनय करतो तेव्हा मी दिग्दर्शनात फारसा गुंतत नाही. माझ्या दिग्दर्शकाला माझ्याकडून काय हवे आहे, याचा विचार मी करतो. युनिटमधील आम्ही सर्वजण एकमेकांना सूचना देतो आणि सुधारणा करतो. मी चित्रपटात दिग्दर्शकाला माझ्याकडून अपेक्षित असलेलं काम केलं होतं,” असं नागराज मंजुळे म्हणाले. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय.
नागराज यांचा ‘झुंड’ चित्रपट अमिताभ बच्चन आणि काही लोकप्रिय चेहरे असूनही फ्लॉप झाला होता. याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. “मला असं वाटतं की चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ चुकीची होती. लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घाबरले होते, करोनामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात यायला तयार नव्हते. त्यामुळे हा आमच्यासाठी नाही तर प्रत्येकासाठी आणि प्रत्येक चित्रपटासाठी कठीण काळ होता,” असं ते म्हणाले.
नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वीच कुस्तीपटू कसाबा जाधव यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे. याशिवाय ते सिद्धार्थ रॉय कपूरसोबतचा ‘मटका किंग’च्या कामातही व्यग्र आहेत. “मी चित्रपटाचे स्क्रिप्टिंग केले आहे, आणि आम्ही प्री-प्रॉडक्शन सुरू केले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.