मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी २०२४ मध्ये आपल्या हक्काचं घर खरेदी करत स्वप्नपूर्ती केली आहे. प्रसाद ओक, मंगेश देसाई, अदिती द्रविड, अश्विनी महांगडे, रुपाली भोसले अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश करत त्यांच्या चाहत्यांबरोबर सुंदर असे फोटो गेल्या काही दिवसांत शेअर केले. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नम्रताने नव्या घराची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नम्रता संभेरावने जुन्नर येथे तिचं दुसरं घर गावच्या शेतात बांधलं आहे. “आमचं शेतीघर” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची पहिली झलक शेअर केली आहे. “गणपती बाप्पा मोरया! आमचं शेतीघर… स्वत:वर नेहमी विश्वास ठेवा मग सर्वकाही शक्य होतं. तुम्हाला प्रेमाची साथ असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात… #नवीन घर #सेकंड होम” असं सांगत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : “आयुष्यातला सर्वात मोठा घोटाळा..”, पूजा भट्टबरोबर झालेल्या ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच रणवीर शौरीने सोडलं मौन!, म्हणाला…

नम्रताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं शेतातलं सुंदर असं टुमदार घर पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या दुसऱ्या एका फोटोमध्ये पती योगेश संभेराव व तिचा लाडका लेक रुद्राज यांच्याबरोबर ती नव्या घराची पूजा करत असल्याचं पाहायला मिळतंय.

नम्रताने तिच्या नव्या शेतघरात गृहप्रवेश करताना पारंपरिक लूक केला होता. सुंदर साडी, केसात गजरा, नाकात नथ, गळ्यात ठुशी, हातात हिरवा चुडा अशा मराठमोळ्या लूकमध्ये नम्रता खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीच्या पतीने व छोट्या रुद्राजने देखील यावेळी एकमेकांना मॅचिंग असा लूक केला होता.

हेही वाचा : दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

सध्या नम्रता संभेराववर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तुषार देवल, सुयश टिळक, किशोरी अंबिये, श्रेया बुगडे, स्वानंदी टिकेकर, पियुष रानडे या कलाकारांनी कमेंट्मध्ये अभिनेत्रीला या नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय प्रसाद खांडेकरने “खूप खूप खूप अभिनंदन संभेराव फॅमिली… नमा योगेश आणि मालक रुद्राज” अशी खास कमेंट करत संभेराव कुटुंबीयांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, नम्रता संभेरावच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अलीकडेच ती ‘नाच गं घुमा’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासह मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namrata sambherao bought new farm house in pune junnar shared photo sva 00