Nana Patekar On Marathi Cinema : नाना पाटेकर सध्या त्यांच्या ‘वनवास’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यामध्ये त्यांच्यासह उत्कर्ष शर्मा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘अमुक तमुक’ युट्यूब वाहिनीच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी नानांनी मराठी चित्रपटसृष्टीबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीसह हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते म्हणून नाना पाटेकरांना ( Nana Patekar ) ओळखलं जातं. गेली अनेक दशकं मनोरंजन विश्वात सक्रिय असणाऱ्या नानांनी मराठी सिनेमे हिंदीत डब का होत नाहीत? असा सवाल विचारत खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “स्मितामुळे मी सिनेमात आलो, नाहीतर…”, नाना पाटेकरांचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता? सांगितली ४६ वर्षांपूर्वीची आठवण

मराठी सिनेमे हिंदीत डब का होत नाहीत?

नाना पाटेकर ( Nana Patekar ) म्हणतात, “सगळे साऊथचे सिनेमे ( दाक्षिणात्य चित्रपट ) आपण हिंदीत डबिंग केलेले असतात ते टिव्हीवर पाहतो. मग मराठी सिनेमे हिंदीत डब का होत नाहीत? खरंतर व्हायला पाहिजेत. सगळेच सिनेमे टुकार नसता पण, मी काही टुकार साऊथचे सिनेमे हिंदीत डब झाल्याचं पाहिलंय. ते कसे काय चालले आणि का पाहावेत असे प्रश्न पडतात…ते सिनेमे सुद्धा चॅनेलवर सुरू असतात.”

“एकीकडे साऊथचे सगळे सिनेमे डब होत असताना मराठीतले सिनेमे डब होत नाहीत. ‘काकस्पर्श’सारखा सिनेमा हिंदीत का डब झाला नाही? आता अलीकडेच ‘फुलवंती’ प्रदर्शित झाला. त्यात रवींद्र महाजनींचा मुलगा गश्मीर आणि प्राजक्ता माळी यांच्या भूमिका आहेत. काय तो सिनेमा गोड आहे. तो सिनेमा, त्याची भव्यता डोळ्यांना सुद्धा खूप सुंदर भासते, अतिशय श्रीमंत वाटावं असा तो सिनेमा आहे. मग आपण असे मराठी सिनेमे का नाही डब करत? पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पण, आता वेगळंय… त्यामुळे, एखादा चित्रपट तयार करत असताना केवळ मराठीपुरतं त्याला मर्यादित ठेवायचं नाही. सर्वस्पर्शी कथा झाली की, चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचतो” असं मत नाना पाटेकरांनी मांडलं आहे.

हेही वाचा : हाऊसफुल शो; मुख्य नायिकेचा नवरा वारला अन्…; नाना पाटेकरांनी सांगितला नाटकाचा प्रसंग, म्हणाले, “पडदा बंद होत होता…”

दरम्यान, नाना पाटेकरांच्या ( Nana Patekar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांच्यासह सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांच्या प्रमख भूमिका होत्या. तर, येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘वनवास’ चित्रपटात ते प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar asked why marathi cinema not dubbed in hindi like south movies says phullwanti is masterpiece sva 00