राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर सातारा जिल्ह्यातील जल पर्यटनाचे काही फोटो शेअर केले आहेत. जल पर्यटनाच्या शुभारंभाचे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये अनेक मंत्र्यांसह ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व ’12 th फेल’ चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे, त्या अधिकारी श्रद्धा जोशी शर्मा दिसत आहेत.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशयातील तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रीमती श्रद्धा जोशी-शर्मा आणि मुनावळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते, अशा मजकुरासह काही फोटो एकनाथ शिंदे यांनी केले आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंनी शेअर केलेल्या या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ओले आले’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते, यात सायली संजीव व सिद्धार्थ चांदेकर यांच्याही भूमिका होत्या.