अभिनेते नाना पाटेकरां( Nana Patekar)नी मराठीसह अनेक चित्रपटांत कामं करून त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अनेक भूमिका, डायलॉग लोकप्रिय झाले आहेत. १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘क्रांतिवीर’ चित्रपटातील ‘आ गए मेरी मौत का तमाशा देखने’हा डायलॉग असो किंवा २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘नटसम्राट’ चित्रपटातील ‘कुणी घर देता का घर? ‘ डायलॉग असो. नाना पाटेकरांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली. आता एका मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रात यायचे का निवडले, काही भूमिका गमावण्याची खंत आहे का? याबद्दल वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले नाना पाटेकर?

अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच ‘बोल भिडू’ला मुलाखत दिली. ही मुलाखत लेखक अरविंद जगताप यांनी घेतली आहे. या मुलाखतीत अरविंद जगताप यांनी विचारले की, अभिनयच करावा असं का वाटलं? यावर बोलताना नाना पाटेकरांनी म्हटले, “एक तर माझा गंड होता की माझे आई-वडील माझ्या दुसऱ्या भावंडांवर जास्त प्रेम करतात, माझ्यावर कमी करतात. माझं नाटक होतं ते पाहायला वडील मुंबईहून गावाला आले. म्हटलं वडिलांचं लक्ष वेधण्यासाठी हे चांगलं आहे. तिथून कुठेतरी माझं नाटक सुरू झालं. वडिलांना नाटक-सिनेमाचं भयंकर वेड होतं. ‘हामिदाबाईची कोठी’ नाटक झाल्यावर ते बॅक स्टेजला आले आणि विजयाबाईंना म्हणाले, फार सुंदर नाटक आहे. तुम्ही सगळ्यांनी अप्रतिम कामं केलीत. माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले, या मुलाने सगळ्यात छान काम केलं. तर बाईंना माहीत नव्हतं ते कोण आहेत. बाई म्हणाल्या, म्हणजे काय? माझा मुलगा आहे तो. वडील म्हणाले, हो, माझाही आहे. तेव्हा मी बाईंना ओळख करून दिली की हे माझे वडील आहेत, त्यांना खूप अभिमान आहे की हा माझा मुलगा आहे.”

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “बरं जी एक व्याख्या असते की कसा दिसतो वैगेरे, आमचं दिसणं असं काही नव्हतं. आम्ही रासवट दिसणारे. सर्वसामान्य, रस्त्यावरचा कोणी दिसत असेल तसे आम्ही, पण मग माझी धारणा अशी झाली की तुमचं दिसणं हे एक मिनिट, दोन मिनिट त्याच्यानंतर तुम्ही काय करता हे सगळ्यात महत्त्वाचं. ओम पुरीच्या चेहऱ्यावर सगळे देवीचे डाग, पण त्यांनी काम काय सुंदर केली आहेत. नसिर हा पारंपरिक सुंदर दिसणारा आहे असं नाही, इरफान खान या सगळ्या मंडळींनी इतकं छान काहीतरी करून ठेवलंय; आम्ही ओटीटीवाले, मेन पिक्चरमधले नाही.”

अरविंद जगताप यांनी म्हटले, “तुम्ही ओटीटीच्या आधीचे सुपरस्टार. तुम्ही पहिल्यापासून अग्नीसाक्षी आणि इतर सिनेमे केलेत.” यावर नाना पाटेकरांनी म्हटले, “नाही, नाही. मला या इंडस्ट्रीनं नाव दिलं, खूप पैसे दिले. खूपसे रोल गेले माझे त्यात माझा माजोर्डेपणा; पण ते ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं जगू शकलो याचं समाधान आहे.” यावर त्यांना विचारले की, एखादा सिनेमा गेला त्याची खंत नाही का? यावर नाना पाटेकरांनी म्हटले, कशाची? जे आपलं नव्हतं ते नाही. ते सोडून द्या ना”, असे म्हणत नाना पाटेकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: ‘आवेशम’ फेम मल्याळम अभिनेता ‘या’ अभिनेत्रींसह बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, इम्तियाज अली असणार चित्रपटाचे दिग्दर्शक

दरम्यान, नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ओळखले जातात. याचबरोबर, त्यांच्या सामाजिक कामांचीदेखील चर्चा होताना दिसते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar on dont he regret losing a movie role says satisfied that i have been able to live my way nsp