ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर जवळपास तीन दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. उत्तम अभिनयाप्रमाणेच नाना त्यांच्या बेधडक स्वभावासाठी देखील ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर नेहमीच ते आपलं मत मांडत असतात. नुकत्याच टीव्ही ९ दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी सध्याची राजकीय परिस्थिती व येत्या काळात ते राजकारणात प्रवेश करणार का याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकर “महाराष्ट्रातील असे कोणते पाच प्रश्न आहेत जे तात्काळ सोडवले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?” याविषयी म्हणाले, “हे फक्त पाच प्रश्नांपुरतं मर्यादित नाही असे खूप प्रश्न आहेत. यावर जर मी बोलू लागलो, तर परखडपणे मत मांडतो. अशाने मग वाद निर्माण होतात. पण, खरं सांगायचं झालं, तर मी कोणत्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते आणि मी कट्टर शिवसेनेवाला होतो. आता भाजपा खूप काहीतरी चांगलं करेल अशी मला खात्री वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस ही मंडळी चांगलं काम करत आहेत. तसेच नितीन गडकरी फारच मुद्देसूद बोलतात. आपण आहे ते काम अतिशय प्रामाणिकपणे केलं पाहिजे हे गडकरींकडे पाहून लक्षात येतं. तो माणूस खरंच अजातशत्रू आहे. सगळ्यांनाच ते हवेहवेसे वाटतात.”

हेही वाचा : “प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय”, मुंबई विमानतळाच्या व्यवस्थेवर राधिका आपटे संतापली, पोस्ट व्हायरल

राजकारणात प्रवेश करणार का याबाबत सांगताना अभिनेते म्हणाले, “जो कोणी चांगलं काम करतो त्यांना नमस्कार करायचा. फक्त या लोकांकडे स्वत:साठी वैयक्तिकरित्या काहीच मागायचं नाही, तरच तुमची मैत्री टिकून राहते. मला राजकारणात कधीच टिकता येणार नाही. राजकारणाबाहेर असल्यावर तुम्हाला तुमची मतं मांडता येतात. तिथे गेल्यावर तुमच्या मताला किती किंमत राहते हे मला माहिती नाही.”

हेही वाचा : “माझा आवाज आत्यांसारखा नाही म्हणून…”, लता मंगेशकरांची भाची राधा यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “लोकांनी माझ्या कुटुंबावर…”

दरम्यान, नाना पाटेकरांबद्दल सांगायचं झालं, तर नुकतेच ते ‘ओले आले’ या चित्रपटात झळकले होते. यामध्ये नानांसह सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar reaction on current politics and actor praised bjp leaders sva 00