Ashok Saraf & Nana Patekar : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सध्या ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेविश्वाच्या महानायकाने नुकतीच ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेला चाहत्यांचा एक धक्कादायक व लक्षात राहणारा अनुभव सर्वांना सांगितला.

हा प्रसंग ‘हमीदाबाईची कोठी’ या गाजलेल्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडला होता. यामध्ये नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर असे सगळे दिग्गज कलाकार होते. हे नाटक विजयाबाईंनी बसवलं होतं. हे सगळे कलाकार एकदा नाटकाच्या प्रयोगासाठी दौऱ्यावर गेले होते आणि नाटकात अशोक सराफ आहेत म्हटल्यावर अख्खं गाव त्यांना पाहण्यासाठी लोटलं होतं. यादरम्यान एवढा गोंधळा झाला होता की, नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांना भर गर्दीतून सुखरुपपणे बाहेर काढलं होतं.

अशोक सराफ सांगतात, “हमीदाबाईची कोठी’ या नाटकाचा प्रयोग एका मिलमध्ये होणार होता तिथे रंगमंच नव्हता. त्याठिकाणी एक चौथरा होता त्यावर सेट लावला होता. हे नाटक असं आहे की, ते नाटक उभं राहून करता येत नाही हे संपूर्ण नाटक बसून करावं लागतं. कोठीवरच्या बायका नेहमी खाली बसतात, त्यांच्याकडे खुर्च्या वगैरे नसतात. त्यामुळे झालं असं की रंगमंच नसल्याने ते नाटक पाठीमागच्या लोकांना दिसत नव्हतं. सगळे असे वाकून-वाकून पाहत होते. मग, कुजबूज सुरू झाली…पुढच्या पाच मिनिटांत सगळ्यांनी इतका गोंधळ केला की विचारू नका.”

अभिनेते पुढे म्हणाले, “प्रेक्षकांचा गोंधळ झाल्यावर पडदा पाडला…नाटक बंद झालं. नाटक बंद झालं म्हटल्यावर आम्ही सगळे आत जाऊन बसलो. लोक एक-एक करून आत येऊ लागले. बराच वेळ नाटक सुरू होईनात. ते लोक म्हणत होते, तुम्ही उभं राहून हे नाटक का करत नाही? त्यांना सांगितलं… ‘अहो उभं राहून कसं होणार…हे कोठीवरचं नाटक आहे’ नंतर ही गडबड भरपूर वाढली. शेवटी लोकांनी सगळ्या खुर्च्या तोडून टाकल्या, ट्युबलाइट्स फोडल्या, ड्रायव्हर खाली जाऊन झोपला होता, त्याला बाहेर काढून लोकांनी मारलं. इतका गोंधळ झाला की, सगळे स्टेजवर यायला धडपडायला लागले. या सगळ्यात नान्या ( ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ) हुशार होता.”

नाना पाटेकरांनी ‘अशी’ केलेली मदत

नाना पाटेकरांबद्दल सांगताना अशोक सराफ म्हणाले, “नानाला माहिती होतं लोक येऊन आधी मला धरणार… तो म्हणाला, ‘चल अशोक पटकन…’ मला घेऊन तो मागून बाहेर पडला, सगळा काळोख होता. त्या काळोखात खाली सगळा चिखल होता. त्या चिखलातून आम्ही पळत-पळत मुख्य रस्त्यावर आलो. मग त्याने एक रिक्षा थांबवली. तो रिक्षावाला म्हातारा होता. नाना पाटेकरने त्या म्हाताऱ्याला उतरवून मागे माझ्या बाजूला बसवलं आणि नान्या स्वत: ती रिक्षा घेऊन धावत निघाला. रेस्टहाऊस खूप लांब होतं त्याने ती रिक्षा नेली, तिकडे मला एका खोलीत सोडलं आणि परत तो नाटकाच्या प्रयोगाच्या ठिकाणी गेला. बाकीच्या लोकांना आणलं. तोपर्यंत थिएटर फोडून सगळ्या लोकांनी वाट लावली होती. नाहीतर मी लोकांच्या हातात सापडलो असतो तर माझेही तुकडे केले असते.”

“मी रेस्टहाऊसवरून परत यांच्याकडे जायला निघालो कारण, या लोकांची मला काळजी वाटत होती. मग वाटेत हे लोक रिक्षातून येताना दिसले. आम्हाला सगळ्यांना रेस्टहाऊसवर बंद केलं. त्यानंतर मग रात्री ३ वाजता रेस्टहाऊसच्या पुढे एक पोलिसांची गाडी आणि मागे एक गाडी आणि मध्ये आमची बस… असे आम्ही सगळेजण त्या गावातून बाहेर पडलो. तो नाटकाचा प्रयोग मी कधीच विसरणार नाही.”