चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी भारत सरकारकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जातात. ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा १७ ऑक्टोबरला दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘गोदावरी’ चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराने गौरवण्यात आलं. यानिमित्ताने अभिनेता जितेंद्र जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. यानिमित्ताने जितेंद्र जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा डंका; ‘गोदावरी’चे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी शेअर केली खास पोस्ट
“इतने चेहरों में, अपने चेहरे की पहचान, बड़े बड़े नामों में, अपना भी नामो निशान; अखेर स्वप्न पूर्ण झाले. कितीतरी रात्री आणि कलाकुसरीचा हा परिणाम आहे. मला हे होणार होतं, याची आधीच कल्पना होती. पण आता जग याचे साक्षीदार होत आहे. गोदावरी चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अभी तो पार्टी शुरू हुई है!! देव महान आहे!! लव्ह यू निक्या”, असे कॅप्शन जितेंद्र जोशीने म्हटले आहे.
दरम्यान निखिल महाजन यांनी हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिवंगत अभिनेते विक्रम गोखले आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांना समर्पित केला आहे. विक्रम गोखलेंनी निखिल महाजन यांना पहिल्याच दिवशी ते हा मानाचा पुरस्कार जिंकतील असा आशीर्वाद दिला होता. ही आठवण दिग्दर्शकाने ऑगस्टमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यावर सांगितली होती.
‘गोदावरी’ या चित्रपटाचं संपूर्ण कथानक गोदावरी नदीभोवती फिरत असून या चित्रपटाद्वारे अनोखी नाती उलगडत जातात. परंपरा, भावना, नात्यामधील चढउतार, आयुष्यातील गुंतागुंत मांडण्यासाठी गोदाकाठ एक धागा आहे. गोदावरी चित्रपटामधून प्रेक्षकांना तीन पिढ्यांमधील संघर्ष आणि त्यांच्यात असणारा समान धागाही पाहायला मिळेल. गोदावरी चित्रपटात जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, नीना कुलकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले.