Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 3: महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत खूप चांगली कमाई केली आहे. या सिनेमाच्या तीन दिवसांचे कलेक्शन किती, ते जाणून घेऊयात.
‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट शुक्रवारी (२० सप्टेंबर रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वीकेंड असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट दिनाचा सिनेमाला फायदा झाला, तर नंतरचे दोन दिवस वीकेंड असल्याने चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली.
‘नवरा माझा नवसाचा २’ चे तीन दिवसांचे कलेक्शन
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १.८६ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली, चित्रपटाने २.४३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ ने ३.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाची तीन दिवसांची कमाई ७.८४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
Bigg Boss Marathi – “बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका…”, अरबाज Eliminate झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; वाचा भन्नाट प्रतिक्रिया
१९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. नवा नवस अन् एसटीऐवजी रेल्वेचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तीन दिवसांत मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ मधील कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), स्वप्नील जोशी, हेमल इंगळे (Hemal Ingale), निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार या चित्रपटात आहेत. यामध्ये श्रिया पिळगांवकर हिचा कॅमिओ देखील आहे.