Navra Maza Navsacha 2 Fame Actres Hemal Ingle : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. तसेच आता येत्या काही दिवसांत ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर, अभिनेत्री हेमल इंगळे असे बरेच कलाकार लग्न करणार आहेत. यापैकी हेमलच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. केळवण झाल्यावर आता हेमलचा ग्रहमख सोहळा पार पडला आहे. याचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ग्रहमख सोहळ्यासाठी हेमल मराठमोळा लूक करून तयार झाली होती. गडद निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने, मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. हेमलने ग्रहमखचा व्हिडीओ शेअर करताना एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.
हेही वाचा : सलमान खानशी लग्न ठरलेलं, पत्रिकाही छापलेल्या…; संगीता बिजलानीची भर कार्यक्रमात कबुली, दोघांचं लग्न का मोडलं?
अभिनेत्री हेमल इंगळे अडकणार लग्नबंधनात
हेमल ( Hemal Ingle ) लिहिते, “मुहूर्त संपन्न… गणपती बाप्पाची प्रार्थना करून एका नव्या प्रवासाची आज मी सुरुवात करते आहे. खरंतर, हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी खूपच भावनिक प्रसंग आहे. कारण, मुली सासरी जाताना इतक्या भावुक का होतात याचं गांभीर्य मला आधी कधीच जाणवलं नव्हतं… पण, आता मला समजतंय की, स्त्रियांचं आयुष्य सोपं नसतं. आपलं घर, आजवरचं आयुष्य सगळं सोडून एका नव्या प्रवासाला सुरुवात करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी एक नवं कुटुंब माझी आतुरतेने वाट पाहतंय त्यासाठी मी नक्कीच उत्साही आहे.”
हेही वाचा : Bigg Boss 18: १२व्या आठवड्यात हृतिक रोशनची लाइफ कोच झाली एविक्ट; म्हणाली, “कशिशमुळे मी आज बाहेर…”
हेमलच्या ( Hemal Ingle ) होणाऱ्या नवऱ्याचं नाव रौनक चोरडिया असं आहे. या दोघांचा साखरपुडा ऑगस्टमध्ये पार पडला होता. जवळपास साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान, हेमलच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटातून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. तसेच यावर्षी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.