मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजुक होती. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर कलाकार मंडळी भावूक झाली आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते मराठीमधील अनेक दिग्गज कलाकारांनी विक्रम गोखले यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली. अभिनेत्री नीना कुळकर्णीही विक्रम गोखले यांच्याबाबत बोलताना भावूक झाल्या आहेत.
नीना कुळकर्णी म्हणाला, “विक्रम गोखले माझा गुरु बंधू. तुझ्याबरोबर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांतून काम केलं. तुझी बहीण म्हणून तर कधी बायको म्हणून ते अगदी आता आता तुझी सून म्हणून देखील काम केलं. दरवेळी मला अभिनयातला एखादा नविन पैलू तू दाखवून दिलास.”
आणखी वाचा – विक्रम गोखले यांच्या निधनाने बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले “भूमिका निभावली आणि हा मंच…”
“तुझ्याकरता मी तुझी गुरु भगिनी आणि मैत्रिण होते. तुझ्याबरोबर काम करताना अनुभवणारी सहजता, काहीतरी मोलाचं गवसल्याचं कलात्मक समाधान. या संचिता करता मी तुझी ऋणी आहे. हा अनुभव पुन्हा पुन्हा मिळणे नाही. तुझं थोरपण तुझ्या अभिनयातल्या सहजतेमध्ये, व्यक्तिरेखा जाणून घेण्याच्या ताकदीमध्ये, तुझ्यातल्या अभ्यासाच्या कुतुहलामध्ये होतं. असतील बहु, होतील बहु, परंतु या सम हा.” नीना व विक्रम गोखले यांचा ‘गोदावरी’ या शेवटचा चित्रपट ठरला.