लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची त्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. हा चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कालच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
गेले अनेक दिवस प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या टिझरला आणि गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलरही तितकाच दमदार असणार याची सर्वांना खात्री होती. अखेर हा ट्रेलर काल प्रदर्शित झाला.
‘सुभेदार’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्या वेळेची सामाजिक परिस्थिती, तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील मैत्री, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई साहेब यांच्यातील नातं, कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी केलेली लढाई, तर दुसरीकडे मालुसरे कुटुंबामध्ये सुरू असलेली रायबाच्या लग्नाची लगबग हे सगळं पाहायला मिळत आहे. तर या ट्रेलरमधील डायलॉग्सनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
हा ट्रेलर पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी हा ट्रेलर आवडल्याचं सांगत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणीही आलं सुभेदारांची निष्ठा पाहून… जय भवानी जय शिवराय.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “१८ तारखेला येणारा अनुभव हा अविस्मरणीय असेल हे या ट्रेलरने नक्की केलं. खूप खूप धन्यवाद दिग्पाल लांजेकर दादा.” तर आणखी एकाने लिहिलं, “बोलायला काही शब्द नाहीत इतका मस्त ट्रेलर…” तर आणखी एक म्हणाला, “साउथवाले केजीएफ, पुष्पा, आरआरआर बनवतात. उत्तर भारतीय पठाण आणि वॉर बनवतात. दोन तास वेळ काढा अंगावर काटा येण्याची व्याख्या समजेल असे चित्रपट मराठी माणूस बनवतो.” त्यामुळे आता सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.