मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांबरोबरच काही विनोदी तसेच कौटुंबिक मराठी चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. अशामध्येच आता आणखी एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘एकदम कडक’ या मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये तरुण कलाकारांची पिढी पाहायला मिळेल.
‘सैराट’ चित्रपटामध्ये लंगड्या पात्र साकारणारा तानाजी गलगुंडे व सल्या म्हणजेच अरबाज शेख ‘एकदम कडक’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांबरोबरच अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संतही चित्रपटामध्ये महत्त्वाचं पात्र साकारताना दिसतील. ही तरुण कलाकार मंडळी या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत.
चित्रपटाचे पोस्टर पाहता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर चित्रपटाची कथा आधारित असल्याचं दिसून येत आहे. पोस्टरवर दिसत असलेली मुलं नेमकं कोणत्या मुलीला पाहत आहेत? ही अभिनेत्री कोण? हे सध्यातरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर अभिनेत्रीचा चेहरा लपवण्यात आला आहे.
निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप यांचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. तसेच सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.