गेल्या अनेक दिवसांपासून विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक विषय, महिला केंद्रीत यांसह आता विनोदी प्रेमकथेवर आधारित एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
या ट्रेलरमध्ये एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र पाहायला मिळत आहे. यात शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरताना पाहायला मिळणार आहे. आत्मचरित्र थोरामोठ्यांचीच असतात असा सर्वसाधारण नियम आहे, पण अत्यंत सामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असूच शकतं, आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं अशी कथा ‘आत्मपॅम्फ्लेट’ मधून मांडण्यात येणार आहे. या चित्रपटामधील डायलॉगनेही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात आत्मपॅम्फ्लेटचा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला आहे.
आणखी वाचा : “…म्हणून मी ट्रेनमध्ये ड्रेस मटेरिअल विकायचे”, विशाखा सुभेदार यांचा खुलासा, म्हणाल्या “माझा नवरा…”
आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.