आजही चित्रपटसृष्टीमध्ये ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचं नाव आदराने घेतलं जातं. १३ जुलै २००९मध्ये निळू फुले यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर १४ वर्षांचा काळ लोटला तरी निळू फुले यांच्या आठवणी कायम आहेत. आता त्यांच्या जयंतीनिमित्त मुलगी गार्गी फुलेने मोठी घोषणा केली आहे. गार्गीने वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कलाक्षेत्रामध्ये काम करणं निवडलं. ती आता मराठीमधील एक उत्तम अभिनेत्री आहे.
वडिलांच्या जयंतीनिमित्त गार्गीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबरीने तिने निळू फुले यांचा फोटोही शेअर केला आहे. गार्गी म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. आज तूझ्या वाढदिवसानिमित्त ‘निळू फुले सन्मान’ या तुझ्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची पुन्हा एकदा घोषणा करत आहे. याचा अत्यंत आनंद होत आहे. ७-८ तारखेला सगळ्यांनी जरूर या. वाट पाहते”.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
शनिवारी ८ एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गार्गीने याची नुकतीच घोषणा केली आहे. गार्गी कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे, मराठी मालिकांमध्ये उत्तम काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री गायत्री दातारच्या आईची भूमिका गार्गीने साकारली.
‘तुला पाहते रे’ मालिकेत ईशाची आई सौ. निमकर हे पात्र गार्गीने साकारलं. गार्गीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “बाबांची एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहणार आहे. ती म्हणजे, जेव्हा तू कॅमेऱ्यासमोर असशील तेव्हा तू स्वत: अमिताभ बच्चन आहेस असंच समज. तुझ्यासमोर कितीही मोठा कलाकार असला तरी तुझा अभिनय दमदारच असला पाहिजे”. गार्गी वडिलांची हीच शिकवण पुढे घेऊन जात आहे.