करारी आवाज व दमदार अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, मराठी सिनेसृ्ष्टीतील जातीवंत कलाकार अशी ओळख असणारे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच लाडके निळू फुले यांचा आज जन्मदिवस. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण करणाऱ्या निळू फुलेंनी चार दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलं. ‘एक गाव बारा भानगडी’मधील ‘झेलेअण्णांची’च्या भूमिकेमुळे निळू फुलेंना सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटात निळू फुलेंनी साकारलेल्या भूमिका अजरामर झाल्या. रंगभूमी देखील निळू भाऊंनी चांगलीच गाजवली. ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ निळू फुलेंची या नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आज निळू फुले यांचा जन्मदिन. याचनिमित्ताने निळू फुलेचं बालपण, शालेय शिक्षण अन् राष्ट्र सेवा दलाशी कसा आला संबंध? हे जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दूरदर्शन सह्याद्री’वरील ‘सृजनवेध’ या कार्यक्रमात निळू फुलेंनी त्यांच्या बालपणाविषयी सांगितलं होतं. निळू फुले म्हणाले होते, “पुण्यातील खडक माळ म्हणजे सगळी मिश्र वस्ती. पाठिमागे हरिजन वस्ती होती आणि त्यामागे शाळा, हॉस्पिटल, वसतीगृह, चर्च होतं. तिथेच ख्रिश्चन मंडळींची वस्ती होती. त्याच्याही पाठीमागे संपूर्ण मुस्लीम वस्ती, असं अतिशय मिश्र वस्तीमध्ये माझं बालपण गेलं. मला आठवतंय, भिन्न धर्मिय असून सुद्धा तिथे कधी तसे वादविवाद झाले नाहीत. माझ्या बाजूला इब्राहिम नावाचं कुटुंब होतं. त्याच्या घरी दिवाळी साजरी केली जात होती. १ तारखेला किंवा नाताळाच्या काळात सर्व ख्रिश्चन मंडळी आमच्या घरी येऊन फराळ वगैरे देत असे, असं अतिशय जिव्हाळ्याचं वातावरण त्या काळात होतं.”

हेही वाचा – निळू फुलेंच्या जन्मदिनानिमित्ताने लेक गार्गी फुले-थत्ते यांची खास पोस्ट, म्हणाल्या, “तू जिथे असशील…”

घराच्या परिस्थितीविषयी निळू भाऊ म्हणाले होते, “त्याकाळातली घरामधली अवस्था फार वाईट होती. सगळ्यांना कष्ट करावं लागतं होतं. आई फुलांच्या माळा करायची. बहीण-भाऊ सगळे मदत करत होते. वडील थोडे थकलेले होते. मंडईमध्ये लोखंडी सामानाचा गाळा होता आणि खुद्द मंडईत कांदे-बटाट्याचे दोन गाळे होते. तरीसुद्धा त्या वयात त्यांना होत नव्हतं. आम्ही सगळे त्यांना मदत करायचो. परंतु एकंदर सर्वांनी काम केल्याशिवाय पोटभरत नव्हतं. महिन्याचा सर्व जमा खर्च आहे, तो जर पुरा पडायचा असेल तर सगळ्यांना काम करावं लागायचं. आई-वडील सोडून भावडांची क्रिकेटची टीम होती. आम्ही एकूण भावंड ११ जण होतो.”

तिसरीपर्यंत शिक्षण झालं मध्यप्रदेशात…

“घरामध्ये मुलं जास्त असल्यामुळं थोडा जाणता मुलगा झाला की शिक्षणासाठी आमच्याकडे चुलत्याकडे पाठवायचे. चुलते तेव्हा आमचे स्टेशन मास्तर म्हणून काम करत असे. एकीकडे घरी ही परिस्थिती पण तिकडे मात्र बंगला वगैरे होता आणि तिकडे मुलांचे शिक्षण चांगलं व्हायचं. कारण चुलत्याला तोपर्यंत मुलंबाळ काही नव्हतं. मग ते आवर्जुन आम्हा लोकांना तिथे न्यायचे. साधारण तिसरी-चौथीपर्यंत शिकवायचे आणि मग पुणं हे शिक्षणाचं चांगलं केंद्र म्हणून इकडे पुन्हा यायचं, अशी ती परिस्थिती होती. माझं तिकडे तिसरी पर्यंत शिक्षण झालं.”

निळू भाऊंना शांताबाई शेळके होत्या मराठीच्या शिक्षिका

“उर्वरित शालेय शिक्षण सगळं शिवाजी महाराज हायस्कूलला झालं. बाबुराव जगतापांची शाळा, त्यांनी त्या शाळेची स्थापना केली होती. आमचे त्यावेळेसचे समवस्यक म्हणजे बाबा आढाव, भाई वैद्य, दिनकरराव जवळकरांचे चिरंजीव शिवाजी जवळकर ही सगळी मंडळी त्यावेळेला शाळेत होती. आमचे शिक्षक सांगितले तर आश्चर्य वाटेल. उत्तमराव पाटील (भाजप खासदार), कृष्णराव धुळप, शांताबाई शेळके. शांताबाई या मला मराठीच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर बाबुराव जगताप, मारुतराव कार्ले ज्यांची गणिताची पुस्तकं होती. मला अगदी चांगलंय आठवतंय, वर्गातले जे सगळ्यात ढ विद्यार्थी असायचे, त्यांना शाळा सुटल्यानंतर एक तास ही मंडळी थांबवायचे. कसली फी न घेता कुठल्या कुठल्या विषयामध्ये हा कच्चा आहे, त्या विषयाचं शिक्षण द्यायचे. अतिशय मायेने शिकवायचे. इतिहासाचे शिक्षक टीके पवार यांचं एक विशेष होतं ते म्हणजे बहुजनाचं शोषण होतंय ते जातीच्या, वर्णाच्यामुळे होतंय. त्यामुळे बहुजनांनी आपली सत्ता काबीज केली पाहिजे. सत्तेवर मान ठोकली पाहिजे, असं त्यांचं त्यावेळेचं मत होतं,” असं निळू फुले म्हणाले.

सोंगाड्याने लावलं वेड

पुढे निळू फुले म्हणाले, “मी ज्या ठिकाणी राहत होतो हा गावगाठ भाग होता. तिथे एक नवलोबाचं मंदिर होतं, त्याची दरवर्षी जत्रा असायची. त्या जत्रेत तमाशाची मंडळी यायची. रात्री १० वाजता सुरू झालेला तमाशा दुसऱ्या दिवशी १२ वाजता संपायचा. हे तमाशे मी पाहिले होते. त्यामुळे वाटायचं आपण पण असं काहीतरी करावं. या तमाशाची कथानक पौराणिक असायची. शिवाय विनोदी खूप असायची. किसन कुजगावकर हा जो सोंगाड्या होता, तो अतिशय उत्तम सोंगाड्या होता. तो अभिनय फार करायचा नाही. जे काही स्टेजवर चाललंय त्याच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात बिडी ओढत बसलेला असायचा. मग घडलेल्या घटनांवर तो भाष्य करत असायचा. ते भाष्य ऐकण्याकरता खरं म्हणजे लोकं जमलेले असायचे. लहानपणी या सोंगाड्यामुळे भारावून गेलो होतो. मीच असं नाही. एकेदिवशी गप्पा मारताना मी व्यंकटेश माडगूळकरांबरोबर बोललो. तेव्हा तात्या मला म्हणाले, हा माणूस चार्ली चॅप्लिनच्या तोडीचा नट आहे, हे मला आठवतंय. इतकी चांगली माणसं होती. पण माध्यमांना त्यांचं फारस कौतुक नव्हतं. का असं घडलं असेल कोणास ठाऊक. पण दत्तोबा तांबे, किशा पुसगावकर ही मंडळी अफलातूल होती.”

हेही वाचा – Video: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो समोर, नेटकरी म्हणाले, “तीन एक्के बाजी मारणार पक्के”

निळू फुले राष्ट्र सेवा दलाकडे कसे वळले?

“खरं सांगायचं तर त्यावेळेला आम्हाला काही कळतं नव्हतं. भाऊ स्वातंत्र्य चळवळीत होता. त्या काळात तो जेलमध्येही गेला होता. परंतु आम्ही पहिल्यांदा संघात जात होतो. आमचा जो ग्रुप होतो तो. संघामध्ये विठोबाचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे पटांगण होतं त्याच्यामध्ये ती शाखा भरली जायची. आम्ही सगळी मंडळी खेळायला तिथे मिळेल म्हणून गेलो होतो. झाली एकदा अशी गोष्ट, माझा जो इब्राहिम नावाचा मित्र होता. तर आम्ही तिथे गेलो. दोन दिवस खेळलो. नंतर त्यांनी प्रत्येकाची नाव वगैरे विचारायला सुरुवात केली. जेव्हा त्याला विचारलं तू कोण? तेव्हा तो म्हणाला, इबू म्हणजे इब्राहिम. नंतर आम्हाला सांगितलं, त्याला नका आणू तुम्ही या. आमच्यातलाच एक आमचा सवंगडी त्याला नाही म्हटल्यानंतर आम्ही ती शाखा सोडूनचं दिली. योगायोग असा की, त्यावेळेला आप्पा महादेव, लालजी कुलकर्णी यांनी खडा पटांगण शाखेवर सेवा दलाची शाखा सुरू केली. तर आमच्यापैकी कोणतीतरी सांगितलं की, तिकडे पण असंच काहीतरी सुरू झालंय. तिथे खेळाला मिळत. तर आम्ही तिकडे गेलो. तिकडे मात्र सगळ्यांना घेतलं. इबूलाही घेतलं, त्यानंतर आव्हाड नावाचा आमचा ख्रिश्चन मित्र होता त्यालाही घेतलं. सर्व मिळून आम्ही त्या दुसऱ्या शाखेत गेलो. आम्ही तिथे रमलो. आम्हाला नंतर लक्षात आलं की, या मंडळींच्यामध्ये राहणं आणि भाऊ जी चळवळ करतोय याच कुठेतरी एकमेकांशी नात आहे. हे मला जाणवलं. अशा रितेने मी सेवा दलाकडे वळलो. कायम रुजलो. सेवा दलाचा फार मोठा प्रभाव झाला,” असं निळू फुले म्हणाले होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilu phule childhood memories and relationship with rashtra seva dal pps
Show comments