मराठी कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून निवेदिता व अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. गेली कित्येक वर्षे या दोघांनी रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे. अशोक व निवेदिता यांना एक मुलगा असून त्याचं नाव अनिकेत सराफ आहे. याशिवाय कलाविश्वातील एका अभिनेत्रीला या दोघांनी आपली लेक मानलं आहे. ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीवला अशोक व निवेदिता आपली मुलगी मानतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायली संजीव व निवेदिता सराफ यांनी नुकतीच ‘स्टार परिवार पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी निवेदिता यांनी लाडक्या लेकीला पाहून लगेच तिला मिठी मारली. यानंतर दोघींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्वप्रथम सायली संजीवने अशोक सराफ यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ आणि निवेदिता सराफ यांना यंदाचा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला. सायली अशोक सराफ यांना ‘पप्पा’ म्हणते, तर निवेदिता सराफ यांना ‘मम्मा’ म्हणून हाक मारते.

सायलीविषयी सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, “सायली ही माझी मुलगीच आहे. खरंतर, माझाही नंबर त्यांना पाठ नाहीये. पण, त्यांना सायलीचा नंबर पाठ आहे. मुली वडिलांसाठी कायम खास असतात.”

अशोक सराफ यांना सायली ‘पप्पा’ अशी हाक का मारते?

सायली याबद्दल जुन्या मुलाखतीत म्हणाली होती, “मी त्यांची मानलेली मुलगी आहे. ते ‘काहे दिया परदेस’ ही मालिका आवर्जुन पाहायचे. तेव्हापासून त्यांनी त्यांच्या मनात असं ठरवलं होतं की, आम्हाला मुलगी असती तर ती अशीच असती. त्यामुळे मी त्यांची मानलेली मुलगी आहे. त्या दोघांकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. मी माझ्या वडिलांना बाबा म्हणायचे. अशोक सराफ सरांनी मला स्वत:हून सांगितलं की, मग तू मला ‘पप्पा’ म्हणत जा. ‘काहे दिया परदेस’मध्ये त्यांनी मला पाहिलं होतं. त्याआधी आमची ओळखही नव्हती. ते न चुकता मालिका पाहायचे. यानंतर त्यांच्या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला आम्ही भेटलो. माझ्या वडिलांच्या निधनानंतर पप्पांच्या रुपाने देवाने माझ्या आयुष्यातली ती पोकळी भरून काढली. आमचं नातं खूप खास आहे.”

दरम्यान, सायली संजीव आता लवकरच ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनी याची अधिकृत घोषणा केव्हा करणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.