‘मधुचंद्र’, ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’ आणि ‘सर्जा’ अशा अनेक चित्रपटांतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणजे राजदत्त (Rajdutt) होय. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी राजाभाऊ परांजपे यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६७ ला त्यांनी पहिल्यांदा चित्रपटाचे स्वतंत्र दिग्दर्शन केले. आता एका मुलाखतीत त्यांनी त्या काळात सिनेमे कसे बनायचे, त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास, एक सिनेमा तयार होण्यासाठी किती पैसे लागायचे आणि अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राजदत्त?

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, त्या काळात कास्टिंगची पद्धत काय होती? कोण ठरवायचं की कुठला हिरो, कोण हिरोईन चित्रपटात काम करणार? यावर बोलताना राजदत्त यांनी म्हटले, “मी अनेकदा लोकांशी सहज गप्पा मारायचो. पण, त्या गप्पा मारण्यात माझा हेतू होता. मी त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करत असायचो की एखादे पात्र कोण चांगल्याप्रकारे करू शकतो? अशा तऱ्हेचे प्रश्न करून मी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होतो आणि त्यातून मी कलावंतांची निवड करीत असे. त्यावेळी कास्टिंग डायरेक्टर अशी पद्धतच नव्हती.”

‘पाच दशके सृजनाची’ या माहितीपटात तुम्ही दिग्दर्शकाची खुर्ची वापरणे बंद केलं असं म्हणालात, तर त्यामागचे कारण काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राजदत्त यांनी म्हटले, “ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात खरोखरच केली. बाकी कोणासाठीच नाही तर माझ्यासाठी का? वेगळी का? त्यावर नाव का? कशाकरिता? जिथे आपण काम करतो, तिथे आपण कार्य करत असतो. कोणी मेकअप मॅन असेल, कोणी आर्ट डायरेक्टर असेल, कोणी रंग लावणारा असेल, कोणी कपडे बदलणारा असेल, प्रत्येक जण आपापलं काम योग्य रितीने करण्याचा किंवा अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यातूनच युनिट उभं राहतं. युनिट हा शब्दही त्या अर्थाने महत्त्वाचा आहे. त्यातील युनिटी प्रत्येकाने ठेवणं गरजेचं असतं, ती करण्याचा माझा प्रयास असतो.

पुढे राजदत्त यांनी म्हटले, “सुरुवातीला मी चित्रपटासाठी कधीच तुम्ही किती पैसे देणार हा प्रश्न केला नाही. गुरू, राजा परांजपे यांच्याबरोबरचा मी सात नंबरचा असिस्टंट, याचा अर्थ तो बॉय असतो. हे उचल, ते उचल, इकडे ये इत्यादी अशा कामांतून अशा पद्धतीने मी राजाभाऊंकडून १०-१२ वर्षांत दिग्दर्शन काय असते हे शिकण्याचा प्रयत्न केला. कुठेही त्यावर चर्चा केली नाही. राजाभाऊंच्या आई आजारी होत्या, ते कळलं. त्यांनी दिवसभर शूटिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की, मला माझ्या आईला भेटायला जायला पाहिजे. मी काही सीन तुला घ्यायला सांगतो तेवढे तू घे. त्यांनी ते नोट करायला सांगितले. त्या नोट्स त्यांनी वाचायला लावल्या. त्यातून त्यांनी समजून घेतलं की याला मी सांगितलेलं कितपत कळलं आहे. कोल्हापूरला शूटिंग सुरू होतं. एका दिवसासाठी राजाभाऊ पुण्याला जाणार होते. मी ते जंगलात जाऊन, मला जिथे योग्य वाटेल, तशा जागी जाऊन सीन घेतले. त्यानंतर ती सगळी फिल्म मुंबईला बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीमध्ये जायची. आठ दिवस त्याच्या प्रोसेसला लागायचे. त्यानंतर आम्हाला ते सीन बघायला मिळायचे. रात्री दहा अकराच्यानंतर सगळी कामं आटोपल्यानंतर ते सीन पाहायचे, ही पद्धत होती आणि त्या अंधारामध्ये आम्ही आमचे सीन पाहायचे. जे सीन्स मी घेतले होते, ते पाहताना माझी नजर समोर बसलेल्या राजाभाऊंकडे जायची. त्यांना वाटत होते मी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो, ज्यावेळी माझे सीन्स येऊन गेले, त्यानंतर त्या अंधारात राजाभाऊंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यातही एक भाषा असते. ते हात ठेवणं, त्यांचं एक्स्प्रेशन यातून मी समजलो की त्यांना हे आवडलंय. त्याचवेळेला निर्मात्यांनी राजाभाऊ परांजपेंना सांगितलं की, मी तुला पैसे देईन आणि एक चित्रपट तू याला दे, त्यातून मी पुढे प्रयत्न केला.”

१९६७ सालापासून पाहिलं तर किती रुपयात त्या काळात सिनेमा बनायचा? यावर बोलताना राजदत्त यांनी म्हटले, “संपूर्ण चित्रपटाचं त्यावेळचं बजेट एक ते दीड लाखपर्यंत असायचं. त्यानंतर ते हळूहळू काळाच्या ओघात वाढत गेलं. ते दोन अर्थाने. पैशांची किंमत कमी झाली, यातूनही ते घडलं आणि त्याशिवाय अजून चांगलं करायचं असेल तर वेळ अजून द्यावा लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, किती वेळ आणखीन घालवावा लागेल, यामुळेसुद्धा बजेट वाढत गेलं.”

हेही वाचा: मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

दरम्यान, २०२४ ला राजदत्त यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma bhushan award winner rajdutt shares 60 years ago how many rupees used to make movies nsp