‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक परेश मोकाशी हे सतत चर्चेत असतात. परेश मोकाशी लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा याबद्दल दाखवण्यात आले आहे. याबरोबरच चित्रपट एका गंभीर मुद्द्यावर भाष्य करतो.
गेले काही दिवस या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. काहींनी चित्रपटाच्या नावावरुन त्याची हेटाळणी केली, तर काहींनी चित्रपटाचं भरपूर कौतुक केलं. या चित्रपटाला म्हणावे तसे शोज चित्रपटगृहात लावले नसल्याने बऱ्याच लोकांना चित्रपट पाहायचा असूनही ते शक्य झाले नाही.
यावेळी नेहमीप्रमाणे काही लोकांनी चित्रपटगृहांच्या मालकांना दोषी धरलं तर काहींनी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांच्यावर खापर फोडलं.आता नुकतंच चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष यांनीदेखील चित्रपटाचं प्रमोशन आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर आपली चूकही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कबूल केली आहे.
आशिष बेंडे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, “विकडेजला भरघोस प्रतिसाद मिळू शकेल असे शोज मिळाले आहेत. असो, जोक्स अपार्ट, यात थिएटर्स किंवा प्रेक्षक यांचा कोणाचाच दोष नाही. अगदी १०००% आम्हीच सगळे प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायला कमी पडलो. शेवटी मराठी सिनेमा आणि त्याचं मार्केटिंग आणि पब्लिसिटीचं एक बजेट ठरलेलं असतं. त्या अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत. तर ज्या ज्या प्रेक्षकांना हा सिनेमा बघायची इच्छा असेल त्यांनी बुधवारच्या आत हा सिनेमा बघावा असं मी आवाहन करतो. कारण गुरुवार किंवा शुक्रवारी सिनेमा उतरेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे विकेंपर्यंत थांबून मग बघुयात असा विचार करत असाल तर कदाचित भ्रमनिरास होऊ शकतो. बाकी ज्या ज्या प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे, प्रेम दिलं आहे त्यांचे मनःपूर्वक आभार!”
आशिष यांच्या या पोस्टवर कित्येकांनी कॉमेंट करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.