अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना पाहायला मिळत आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी यांच्या पत्नीने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परेश मोकाशी यांची पत्नी आणि लेखक-अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. याबरोबरच त्यांनी दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे आणि परेश मोकाशी यांच्याबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : “२ तास वेळ काढून…” ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावची पोस्ट, म्हणाली “९० चा काळ…”

मधुगंधा कुलकर्णी यांची पोस्ट

“आत्मपॅम्फ्लेट
चरित्र-आत्मचरित्र वगैरे शब्द थोरामोठ्यांच्या जाडजूड आयुष्यासाठी असतात. तुमच्या -आमच्यासारख्या सामान्य माणसांची गोष्ट एका चिटोऱ्यामध्ये मावेल इतकी ; सकाळी घरी येणाऱ्या पेपरमधल्या पॅम्प्लेट सारखी ! म्हणून आपल्या गोष्टीचे झाले आत्मपम्फ्लेट!
आशिष बेंडे! सर्वसामान्य वाटेल असा पोरगा पण असामान्य हुमर, असामान्य हुशारी आणि चित्रपटांवरचं असामान्य प्रेम !
आशिषचं कौटुंबिक , सामाजिक, शालेय आयुष्य आणि त्यावर राजकीय परिस्थितीचा होत गेलेला परिणाम .. खूप वेळा त्याच्या तोंडून ऐकला होता.. चकित करणारी भाबडी गोष्ट होती .. त्याला म्हणलं एका कागदावर लिहून काढ .. माझ्यातला लेखक प्रोड्युसर इतकी रंजक गोष्ट सोडणार नव्हताच .. शेवटी मागे लागून लागून त्याच्याकडून दहा पानं लिहून घेतली.. मग परेश मोकाशी आणि आशिष बेंडे या दोन वेडसर लोकांनी त्याचा जो काही शालेय , सामाजिक , रोमॅंटिक, राजकीय हिलेरियस गोपाळकाला आत्मपॅम्फ्लेट मध्ये केला तो केवळ आणि केवळ प्रेक्षागृहात जाऊन पाहण्याचा विषय आहे ..

आशिष, माझ्या सगळ्या चित्रपटामध्ये दिग्दर्शकाची खाल पांघरून प्रोडक्शन चा फितूर म्हणून काम करत राहिलास.. पण ज्यावेळी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून मैदानात उतरलास पहिल्याच मॅच ला धुंवाधार खेळ केलास ! परेश वेडा आहेच, पण त्याच्या तालमीत तयार झालेला तू त्याच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे निघाला आहेस..तुझ्याकडून अशाच दर्जेदार कलाकृती होतील यात तिळमात्र शंका नाही मला. तुझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटणारे आम्ही नवराबायको , कायम तुझ्या पाठीशी आहोतच आणि सदैव राहू !

मी प्रोड्युस केलेला पहिलाच चित्रपट आहे ज्याचं लेखन मी केलं नाही..पण तरी आत्मपम्फ्लेट माझ्या टोपीतला तुरा आहे ! तुझा खूप अभिमान वाटतो मित्रा.. तुझा हुमर आणि तुझी पॅशन दोन्हीची मी फॅन आहे . तुला खूप खूप यश लाभो .. लाभणार हे थोरामोठ्यांचं भाकीत आहे. आणि आमची भावांनो घट्ट मिठी, आमच्या पॅशनेट वेड्या टीम साठी – सत्यजीत शोभा श्रीराम , शिशिर चौसाळकर , बबन अडागळे, संतोष गिलबिले , फैजल महाडिक , सचिन गुरव , साकेत कानेटकर , सचिन लोवलेकर , सेजल रणदिवे , रेणू पेंढारकर , जीजीविषा काळे , तन्वी , शर्वरी, अमोल , चंदूसर , राकेश ,शर्मिष्ठा.. आणि अशी सगळी असंख्य माणसं ज्यांचे हातभार ह्या चित्रपटाला लागले.

कलर यलो , टी सिरीज , आणि झी स्टुडिओचा पाठिंबा नसता तर हा चित्रपट बनला नसता, आपलं काम संपलं ! आता चित्रपट प्रेक्षकांच्या हवाली !”, असे मधुगंधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “शालेय जीवन, प्रेम अन्…” सर्वोत्कृष्ट युथ फिल्म पुरस्कार मिळालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paresh mokashi wife actress writer madhugandha kulkarni share special post after release aatmapamphlet movie nrp
First published on: 08-10-2023 at 13:13 IST