गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं. आता त्यांनी त्या घराबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
अजय पुरकर यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या नव्या घराला ‘आई-बाबांचं घर’ असं नाव दिलं आहे. नुकतंच त्यांनी ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी घर घेण्याचा निर्णय कसा घेतला? या घराची खासियत काय? तिथे घर घेण्याचं कारण काय? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “पोरी मला इच्छामरणही चालेल, पण…” ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने ‘कोकण हार्टेड गर्ल’कडे मांडली व्यथा, अंकिता म्हणाली “मी सिनेसृष्टीपर्यंत…”
अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घरात टीव्ही, फ्रीज आणि एसी नाही, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, “मी घरात पंखे लावलेले आहेत. पण त्याचीही विशेष काहीही आवश्यकता नाही.”
“या ठिकाणच्या पाण्याचीही खास गोष्ट आहे. मी जिथे राहतो, त्या ठिकाणाचे पाणी फार सुंदर आहे. कारण हे पाणी डोंगरातून पाझरुन येणारे पाणी आहे. मला इथे जे पाणी लागलेलं आहे, ते मी आयुष्यात प्यायलेलं सर्वोत्तम पाणी आहे. विशेष म्हणजे इथे वेगवेगळं पाणी येत नाही. पिण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जातो.
मी गमतीने या पाण्याला ‘आंबा बिसलरी’ असे म्हणतो. कारण कोणत्याही मिनरल पाण्यापेक्षा जास्त गुणधर्म या पाण्यात आहेत. हे पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. माझे एक-दोन मित्र इथे आल्यानंतर पाच लीटरचे कॅन भरुन पाणी घेऊन जातात”, असे अजय पुरकर यांनी सांगितले.
दरम्यान अजय पुरकर यांनी १९ जूनला २०२२ ला नवीन घरात प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी ‘पावनखिंड’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरही होता. “योग जुळून आलाय. उत्तम मुहूर्तावर दोन्ही गोष्टी घडल्या. महादेवाचा आर्शिवाद”, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले होते.