Payal Jadhav : यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या पर्वात एका स्पर्धकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजेच सूरज चव्हाण. ‘बिग बॉस मराठी’मुळे सूरज चांगलाच चर्चेत आला. या शोच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी त्याला घेऊन ‘झापुक झुपूक’ चित्रपट करणार असल्याची घोषणा केले होती. तेव्हापासून सूरजचे अनेक चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर आणि मिलिंद गवळी असे अनेक कलाकार मुख्य भूमिकांत आहेत.

‘झापुक झुपूक’मधील भूमिकेबद्दल पायल जाधवची प्रतिक्रिया

येत्या २५ एप्रिल रोजी सूरजचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यानिमित्ताने कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. तसंच सूरजच्या कामाचं कौतुकही करत आहेत. अशातच अभिनेत्री पायल जाधवने सूरजचं कौतुक केलं आहे. चित्रपटात पायलने सूरजच्या बहिणीची भूमिका केली असून ही भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य असल्याचे तिने म्हटलं आहे. अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या मुलाखतीत पायलने ‘झापुक झुपूक’बद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल सांगितलं.

“सूरज चव्हाणच्या बहिणीची भूमिका करण्यात माझं भाग्य”

यावेळी पायलने असं म्हटलं की, “यात अजिबात अतिशयोक्ती नाही किंवा कुठलाही अलंकार वापरत नाही. सूरजच्या बहिणीची भूमिका करण्यात माझं भाग्य आहे. सूरजच्या बहिणींमधील माझी आवडती सीता आहे. कारण सूरज तिला घाबरतो. त्यामुळे मला असं वाटतं की, सूरज मला पण घाबरतो. सूरजची बहीण ‘बिग बॉस’मध्ये आली होती. तेव्हा त्यांनी हातात खळखळ आवाज करणाऱ्या बांगड्या आणि सिंदूर वगैरे असा लूक केलं होता. तर या चित्रपटाच्या निमित्ताने मी ही हौस पूर्ण केली आहे.”

“‘झापुक झुपूक’च्या सेटवर आमच्यात चांगला बॉण्ड होता”

यापुढे ती असं म्हणाली की, “सूरजची बहीण करताना खूप मजा आली. सूरज त्याचे संवाद म्हणताना खूपच खरा होता. सेटवर आमच्यात खूप चांगला बॉण्ड होता. मी त्याला माझ्या ओवाळणीच्या साडीवरुन चिडवायचे. साहजिकच ही सगळी मस्करी होती. यापुढे सूरजबरोबर काम करण्याबद्दल ती असं म्हणाली की, “समजा तुम्ही अभिनय शिकला आहात किंवा शिकला नसाल तरी जेव्हा तुमच्याबरोबर अभिनयाशी अनभिज्ञ असलेले व्यक्ती येतो, तेव्हा कलाकार म्हणून तुमचाही कस लागतोच.”

सूरज चव्हाणला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक

दरम्यान, सूरजच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आतापर्यंत चित्रपटातील तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत आणि या गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसंच काही दिवसांपुर्वी आलेल्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यातून सूरजच्या अभिनयाचे सर्वजण कौतूक करत आहेत. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर सूरजला पाहण्यासाठी त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत.