मराठी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी (Swapna Joshi) यांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दोन दिवसांपूर्वी एक चोर शिरला होता. या चोराने घरातून सहा हजार रुपये लांबवले होते. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. स्वप्ना जोशी यांच्या घरात चोरी करणाऱ्या या २२ वर्षीय चोराला पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत गौंडर असे त्याचे नाव आहे.
चोरट्याने स्वप्ना जोशी यांच्या घरात जाण्यासाठी सुरक्षेसाठी लावलेली लोखंडी जाळी कापली होती. तो रविवाही पहाटे ३.१७ वाजता सहाव्या मजल्यावर गेला आणि ३.३० वाजता त्याच मार्गाने पळून गेला, असं जोशी यांच्या फ्लॅटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय, अशी माहिती आंबोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर त्याच दिवशी पोलिसांना जोशी यांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर कापसवाडी, वर्सोवामध्ये हा चोर असल्याची माहिती मिळाली. “त्याने चोरीची रक्कम अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी खर्च केली. चौकशीदरम्यान, त्याने लोखंडी ग्रीलवर चढून फ्लॅटमध्ये शिरल्याची कबुली दिली,” असं आंबोली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं. गुन्हेगारांच्या डेटा रेकॉर्डमुळे या आरोपीचा शोध घेण्यास मदत झाली, असंही त्यांनी नमूद केलं.
घडलेल्या प्रकाराबाबत स्वप्ना जोशी म्हणाल्या…
“मला संशय होता की हा चोर याच परिसरातील अंमली पदार्थांचे व्यसन असलेला कोणीतरी आहे. कारण तो ज्याप्रकारे घरात आला व पैसे चोरून निघून गेला तसं कोणतीही सामान्य व्यक्ती करू शकत नाही. सुदैवाने त्याच्याजवळ शस्त्रं नव्हती. आमचा पाळीव बोका घरात नसता तर कदाचित तो निसटला असता. आमच्या बोक्याने सावध केलं. पोलिसांनी इतक्या लवकर त्याला शोधून काढलं, यासाठी त्याचं कौतुक आहे,” असं स्वप्ना जोशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाल्या.
स्वप्ना जोशी यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज
स्वप्ना जोशी यांचे मित्र अशोक पंडित यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओत चोर पाइपच्या मदतीने घरात शिरताना दिसतोय. त्यानंतर तो घरातील जवळपास सर्वच खोल्या फिरतो, ड्रॉवर चेक करतो. या चोराने स्वप्ना यांच्या मुलीची पर्स लांबवली, त्यात सात-आठ हजार रुपये होते, असं त्यांनी म्हटलंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की चोरटा घरात फिरत असताना तिथे एक बोका फिरतोय, नंतर तो आवाज करतो आणि त्याच्या आवाजामुळे स्वप्ना यांचा होणारा जावई तिथे पोहोचतो. तो चोराचा पाठलाग करतो, पण चोर ज्या खिडकीतून आत आला तिथूनच तो उडी मारून पळून निघून जातो.