Pooja Sawant Dance Video : महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. ‘दगडी चाळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमध्ये पूजाने काम केलेलं आहे. पूजाने मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.
पूजा सावंत सध्या वैयक्तिक आयुष्यात तिच्या भावाच्या लग्नाच्या तयारीमध्ये प्रचंड व्यग्र आहे. नुकताच अभिनेत्रीच्या भावाचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी पूजा भावासह जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळालं.
पूजा सावंतची बहीण रुचिराने भावाच्या हळदी समारंभातील खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पूजाने भावाच्या हळदीत ‘दिल चाहता है’ चित्रपटातील “कोई कहे कहता रहे…” या आयकॉनिक गाण्यावर डान्स केला. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता जवळपास २४ वर्षे उलटली आहेत. मात्र, आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.
पूजा सावंत या व्हिडीओमध्ये बेभान होऊन डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा भाऊ कॅप्शनमध्ये लिहितो, “या सुंदर क्षणांमधून आम्ही अजूनही बाहेर पडत नाही आहोत. आम्हा कुटुंबीयांसाठी हे गाणं अँथम आहे. आज पुन्हा एकदा या गाण्यावर ठेका धरण्याची संधी मिळाली. पूजाचं अजूनही डान्स करून समाधान झालेलं नाही… मयुरेश तुझ्यासाठी आम्ही खूप खूप आनंदी आहोत.”
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “काय जबरदस्त डान्स केलाय”, “सुपर डान्स केलाय”, “वॉव पूजा ताई”, “किती छान.. किती ऊर्जा.. किती हर्ष…. तुझ्या दादाला माझ्या शुभेच्छा”, “पूजा एकदम कमाल डान्स करतेय” अशा प्रतिक्रिया पूजाच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती ‘कपबशी’ सिनेमात झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. आता पूजासह या चित्रपटात कोण प्रमुख भूमिका साकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.