अभिनेत्री पूजा सावंतच्या घरी सध्या लगीनघाई चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. साखरपुडा, हळद आणि ग्रहमख समारंभ पार पडल्यावर आता लवकरच ती सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधणार आहे. पूजाने लग्नाआधी पार पडणाऱ्या सगळ्या विधींसाठी हटके लूक केल्याचं पाहायला मिळालं. साखरपुड्यात महाराष्ट्राच्या या ‘कलरफूल’ अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची थीम निवडली होती. तर, मेहंदी सोहळ्यात पूजाने बहुरंगी लेहेंगा परिधान केला होता. तसेच हळदी समारंभासाठी पूजाने कपड्यांसाठी जांभळ्या आणि दागिन्यांसाठी पांढऱ्या रंगाची निवड केली होती. अभिनेत्रीच्या या हटके लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पूजाची हळद पारंपरिक पद्धतीने पार पडली. यावेळी अभिनेत्रीने हातात हिरवा चुडा, जांभळ्या रंगाचा लेहेंगा आणि त्यावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे दागिने परिधान केले होते. हळदीसाठी सिद्धेशने देखील बायकोच्या लेहेंग्याला मॅचिंग अशा सदऱ्याची निवड केली होती. पूजाच्या या लूकमध्ये एका खास गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतलं. ती गोष्ट म्हणजे पूजाने तिच्या हातात खास ‘सिद्धेशची नवरी’ असं नाव लिहिलेला टॅग परिधान केला होता.
हेही वाचा : मंडप सजला, नवरी नटली! नववधू पूजा सावंतचा लूक आला समोर, बहिणीने दाखवली झलक
पूजा याबद्दल सांगते, “हळदीचे दागिने मी खास बनवून घेतले होते. कारण, या दागिन्यांसाठी मला पिवळा किंवा इतर कोणताच रंग नको होता. यासाठी खास हे पांढऱ्या रंगाच्या फुलांचे दागिने मी बनवून घेतले. यामध्ये एक खास गोष्ट आहे ती म्हणजे “सिद्धेशची नवरी”. हा खास टॅग माझ्या संपूर्ण लूकची शोभा वाढवतो.”
हेही वाचा : भर कार्यक्रमात राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेचे कान टोचले, म्हणाले, “त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये…”
दरम्यान, पूजा आणि सिद्धेश यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं असून लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नात मराठी सिनेविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत.