काही दिवसांपासून मराठी चित्रपट ‘मुसाफिरा’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. काही दिवासंपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रद्रर्शित झाला. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. नुकतेच या चित्रपटाचे ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ ही गाणी प्रदर्शित झाली होती. ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता नुकतेच या चित्रपटाचे तिसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘झिलमिल’ असे या गाण्याचे बोल आहेत. साई -पियुष यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर अदिती द्रविड यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याला सलीम मर्चंट यांचा आवाज लाभला आहे. या अगोदरही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हे नवे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
गाण्याबद्दल पुष्कर जोगने सांगितले की, ‘झिलमिल’ हे गाणे मनाला भिडणारे आहे. स्कॉटिश हायलँड्समध्ये या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. हे गाणे ऐकताना आणि पाहताना आपण स्वतःही तिथेच असल्याचा भास होईल. ही सफर आमच्यासाठीही खूप खास होती. जुन्या मैत्रीची आठवण करून देणारे हे जबरदस्त गाणे आहे.”
या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैत्रीवर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना मैत्रीची नवीन परिभाषा अनुभवायला मिळणार आहे. अभिनयाव्यतरिक्त पुष्कर जोगने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.