अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या ‘दगडी चाळ’ चित्रपटामधील भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री पूजा सावंतने आपले स्पष्ट मत मांडले आहे.
पूजाने नुकतीच भार्गवी चिरमुले यांच्या गप्पा मस्ती पॉडकास्टला हजेरी लावली होती. या वेळी अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. दैनंदिन आयुष्यात एक कलाकार म्हणून ट्रोलिंगचा सामना कसा करतेस? याबाबत पूजा स्पष्ट मत मांडत म्हणाली, “ट्रोलर्सनी ट्रोल कलाकारांना ट्रोल करावे. आपण लोकशाहीत राहत असल्याने याबद्दल त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण, स्वत:ची लायकी सोडून एखाद्याला ट्रोल करणे चुकीचे आहे, तुम्हाला काहीच अधिकार नाही.”
हेही वाचा : नरवीर तानाजींची शौर्यकथा उलगडणारा ‘सुभेदार’
पूजा पुढे म्हणाली, “एखाद्या कलाकाराला सभ्य भाषेत ट्रोल करता येऊ शकते. पण, आजकाल वाचता येणार नाही अशा आक्षेपार्ह कमेंट्स केलेल्या असतात. किळसवाण्या ट्रोलर्सचे मी कधीच समर्थन करणार नाही. मला अनेकदा त्या कमेंट्स वाचून खूप वाईट वाटते. मी त्या आक्षेपार्ह कमेंट्स डिलीट करते किंवा त्या युजरला ब्लॉक करते. माझ्या आयुष्यात मला नकारात्मकता नको आहे. अलीकडेच मी भगवान शंकराच्या मंदिरात जातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मी साडी, टिकली, गजरा व्यवस्थित गेले होते. तेव्हा माझ्या गळ्यात काहीच घातलेले नसल्याने ‘मॅडम गळ्यात काहीतरी घाला, ही आपली भारतीय संस्कृती आहे. ‘ अशा कमेंट्स करण्यात आल्या होत्या.”
हेही वाचा : ‘गदर २’ की ‘ओएमजी २’, कोणत्या चित्रपटाने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? वाचा दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे
“मी आता सांगितल्या त्यापेक्षा वाईट कमेंट्स केल्या जातात. मला त्या आक्षेपार्ह प्रतिक्रिया वाचून खूप त्रास होतो आणि मी डिलीट करते. प्रत्येकाच्या आयुष्यात नकारात्मकता आहेत. पण, मी नेहमीच सकारात्मकतेचा विचार करते. माझ्यासाठी माझे सकारात्मक चाहते जास्त महत्त्वाचे आहेत.” असे पूजाने सांगितले.