Pooja Sawant Wedding Video : पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी खास उपस्थिती लावली होती. लग्नानंतर अभिनेत्री सध्या आपल्या पतीबरोबर ऑस्ट्रेलियात एकत्र वेळ घालवत आहे. आज लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याने पूजाने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे.
पूजा सावंतच्या लग्नात मेहंदी, हळद, ग्रहमख असे सगळे विधी करण्यात आले होते. याचे फोटो अभिनेत्रीने यापूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सगळ्या विधींसाठी पूजाने खास लूक केला होता. मात्र, तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यामुळे पूजाने तिच्या लग्नातील Unseen व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
हेही वाचा : आता नाटकाची जागा Reelsने घेतली; प्रथमेश परबची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “काळ बदलला अन्…”
पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील वरमाला, कन्यादान, सातफेरे हे विधी पाहायला मिळत आहेत. लग्न लागल्यावर अभिनेत्रीच्या आईला अश्रू अनावर झाले होते. यावेळी प्रार्थना बेहेरे आणि सुखदा खांडकेकर यांनी पूजाच्या आईला धीर दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याशिवाय पूजाचे वडील आणि दोन्ही भावंडांनी देखील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. त्यानंतर ताईची पाठवणी करताना रुचिरा आणि श्रेयस भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
“आज मी पुन्हा रडले…खूप सुंदर व्हिडीओ” अशी कमेंट यावर पूजाची बहीण रुचिरा सावंतने या व्हिडीओवर केली आहे. अवघ्या काही मिनिटांत पूजाच्या लग्नातील हा गोड व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. दरम्यान, यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं, तर पूजा आणि सिद्धेश यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. तिचा पती कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. नुकताच दोघांनी होळी हा लग्नानंतरचा पहिला सण एकत्र साजरा केला.