Pooja Sawant : ‘क्षणभर विश्रांती’, ‘दगडी चाळ’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांमधून अभिनेत्री पूजा सावंतने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वैयक्तिक आयुष्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये पूजा विवाहबंधनात अडकली. अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असल्याने पूजा अलीकडे दोन्ही देशांमध्ये आपलं काम सांभाळून प्रवास करताना दिसते.
पूजा ऑस्ट्रेलियात असल्यावर तिच्या दैनंदिन जीवनातील विविध अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतंच देवाला पत्र लिहिलं आहे. स्वामी समर्थांना उद्देशून पत्र लिहित पूजाने एक खास इच्छा व्यक्त केली आहे. तिने याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पूजा सावंत तिच्या पत्रात काय म्हणतेय जाणून घेऊयात…
पूजा सावंतने देवाला लिहिलं पत्र
प्रिय स्वामी,
परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, देवाकडे फेसबुक नाही, इन्स्टाग्राम नाही पण, स्वत:चा पत्ता आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर! खरंच किती दिवस झाले ना पत्र लिहून…म्हणून म्हटलं आज थेट तुम्हालाच पत्र लिहिते. आज मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही. पण, तुमच्या दत्त अवतारात जे पायाशी चौघे उभे आहेत ना, त्यांच्यासाठी मी काहीतरी मागणार आहे. स्वामी, या जगात कोणताही मुका प्राणी जेव्हा संकटात असेल, तेव्हा आपल्यातील कोणीतरी त्यांचा देव बनून त्यांच्या मदतीला जाईल आणि त्या मुक्या प्राण्याला मदत करेल. ही बुद्धी जगातील सर्वांना द्या. तसेच मला एवढं सक्षम करा की, मी या भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही. बाकी सगळं ठीक आहे. सध्या माझा पत्ता बदललाय. पण, मी जगाच्या कुठल्याही भागात असले तरी, मन मोकळं करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवायला तुमचा पत्ता मला सापडला आहे.
तुमचीच पूजा.
मुक्कामपोस्ट देवाचं घर, श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट, जिल्हा – सोलापूर
दरम्यान, सर्वात आधी मुक्या प्राण्यांचा विचार केल्याने तसेच त्यांच्यासाठी काळजी व्यक्त केल्यामुळे पूजाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव आहे. याशिवाय तिच्या कामाबद्दल सांगायचं, झालं तर पूजा नुकतीच ‘नाच गो बया’ या गाण्यात झळकली होती. आता येत्या काळात पूजाचे कोणते नवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.