कलाकार आणि सोशल मीडिया आता हे एक समीकरणचं झालं आहे. कलाकार त्यांच्या कलेप्रमाणे सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. प्रत्येक कलाकाराच्या चाहत्याला त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि दैनंदिन घडामोडींविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. म्हणून कलाकार मंडळी देखील आपल्या आगामी प्रोजेक्टपासून दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवापर्यंत सर्व काही चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. कलाकारांचे फोटो आणि रील्स हे नेहमी व्हायरल होत असतात. पण काही वेळा यामुळे कलाकार मंडळी ट्रोल होतात. असंच काहीसं आता प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याबरोबर घडलं आहे. त्यांच्या एका चुकीमुळे त्यांना सध्या ट्रोल केलं जात आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…
मनोरंजनसृष्टीतील गणेश आचार्य हे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे. त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. नुकतंच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘लुट पुट गया’ या गाण्याचं नृत्यदिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. अशा या प्रसिद्ध गणेश आचार्य यांनी काही दिवसांपूर्वी ‘गोमू संगतीनं माझ्या तू येईशील का?’ या गाण्यावर रील केली होती. पण या रीलमधील एक चूक नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे ते ट्रोलर्स जाळ्यात अडकले आहेत.
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अचानक झाला मोठा बदल, सलमान खानने केलं जाहीर
‘गोमू संगतीनं माझ्या तू येईशील का?’ या गाण्यामध्ये ‘तुला रुप्याची नथ मी घालीन’ असे बोल आहेत. ही ओळ गाताना गणेश आचार्य रुपया दाखवताना दिसत आहेत. हेच नेटकऱ्यांना खटकलं आहे. “रुपे म्हणजे चांदी. जुना मराठी शब्द आहे सर”, “रुपयाची नाही दादा चांदीची नथ”, “रुप्याची म्हणजे एक रुपया नाही, रुप हा एक चांदीचा प्रकार आहे ” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी गणेश यांच्या रीलवर केल्या आहेत.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, “ते रुपयाची नाही, रुप्याची (चांदीची) आहे. कशाला नको ते स्टंट करतात कळत नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “रुपयाची नाही हो, रुप्याची… म्हणजे चांदी… चांदी…” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “चांदी समानर्थी शब्द =’रुपे’ नॉट रुपया” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचून अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी देखील या रीलवर आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, “गणेश आचार्य सारखा मोठा कलांवत मराठी गाण्यावर कलाविष्कार करतोय.. ‘रुप्याची नथ’ बद्दल त्यांना करेक्ट करायचं असेल तरी ते प्रेमाने, आदराने करायला हवं. कर्तृत्वसिध्द मोठा कलाकार आहे.”
दरम्यान, गणेश आचार्य यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते फक्त नृत्यदिग्दर्शक नसून चित्रपट दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेते देखील आहेत. त्यांनी ‘मनी है तो हनी है’ या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. तसंच त्यांनी बऱ्याच चित्रपटात अभिनय देखील केला आहे.