वसईतील गावराई पाडा येथे मंगळवार सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली. भररस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे मुंबईसह उपनगरात खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणातील आरोपी रोहित यादवला अटक करण्यात आली आहे. शिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर या भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठी, हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी वसईतील हत्येप्रकरणी संतापजनक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. तसंच त्यांनी एक मुद्दा मांडला आहे, ज्याचा विचार करणं सध्याच्या काळात गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणण आहे. समीर विद्धांस नेमकं काय म्हणालेत? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: “जर तू मेलीस तर मी…”; लेकीच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने क्रांती रेडकरला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “तीन फुटांची पण नाहीये…”

वसईतील हत्येप्रकरणी भाष्य करताना समीर विद्वांस म्हणाले, “वसईत एका मुलीचा तिच्या तथाकथित प्रियकराने दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष निर्घृण खून केला. हे असं वारंवार होत असतं. भयानक आहे हे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं हे प्रश्न आहेतच. पण आता असं वाटत नाही का की शाळांमधून (मराठी, इंग्रजी, महानगरपालिका, खासगी किंवा इतर..) सर्व ठिकाणी मानसशास्त्र हा विषय असायला हवा? मानसोपचार तज्ज्ञ/समुपदेशक बोलावून लहानपणापासून गोष्टी शिकवायला हव्यात? पालकांचेही वेळोवेळी सेशन्स व्हायला हवेत? मला तरी असं वाटतं, की याचा गांभीर्याने विचार करायला हवा. प्रयत्न तरी नक्कीच व्हायला हवेत.”

दिग्दर्शक समीर विद्वांस पोस्ट

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? अभिनेत्याने लिहिली खास पोस्ट, म्हणाले, “माझा हिरो…”

दरम्यान, नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवलं आणि दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितनं आपल्याबरोबर आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली.