लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा'(Chhaava) चित्रपटाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेल्या या भूमिकेचे मोठे कौतुकही होताना दिसत आहे. आता लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक शिंदे(Ashok Shinde) यांनी छावा चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी असताना, ती का नाकारली यावर एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

एवढं यश बघूनसुद्धा जमिनीवर पाय…

अशोक शिंदे यांनी नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की लक्ष्मण उतेकर यांनी तुम्हाला छावा चित्रपटासाठी ऑफर दिली होती. आज तो सिनेमा गाजतोय. काही कारणास्तव तुम्ही त्या चित्रपटात काम करता आलं नाही. मात्र, जेव्हा एखादा मराठी कलाकार हिंदी चित्रपटात काम करतो, तेव्हा त्याचं वजन वाढतं की कमी होतं? तुम्हाला काय वाटतं?असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अभिनेते अशोक शिंदे यांनी म्हटले, “लक्ष्मण उतेकर अत्यंत हुशार दिग्दर्शक आहेत. आता तर ते खूपच यशस्वी झाले आहेत. आम्ही ‘लालबागची राणी’ करत असताना, त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांची स्टाइल मला खूप आवडायची. इतकी ती भारी आहे. त्यांना जो शॉट हवा, तोच ते घ्यायचे. अभिनेता म्हणून त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि दिग्दर्शक म्हणून माझं त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं. माणूस म्हणून उत्तम व्यक्ती आहे. दोन मिनिटात कोणाचीही मैत्री होईल. एवढं यश बघूनसुद्धा जमिनीवर पाय असणारा, प्रेमळ माणूस आहे. शून्यापासून सुरूवात करून आज ते तिथंपर्यंत पोहोचलेत”

जी भूमिका मला…

पुढे छावा सिनेमातील त्यांना ऑफर केलेल्या भूमिकेविषयी अशोक शिंदे म्हणाले, “मला त्यांनी रोल ऑफर केला. मला पहिल्यांदा तर तो सन्मान वाटला. कारण-मॅडॉक सारखी यशस्वी कंपनी आणि लक्ष्मण उतेकर सरांसारखे मोठे दिग्दर्शक यांनी माझा विचार करावा, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. योगायोग असा झाला की त्यातील जी भूमिका मला लक्ष्मण सरांनी विचारली. ती मला करावीशी वाटली नाही. मला वेगळी भूमिका अपेक्षित होती. म्हणून संगणमताने मी त्यांना म्हटलं की सर आपण पुढच्या वेळी एकत्र काम करूयात. पण, ही भूमिका एक तर ती महाराजांच्या विरोधातली आहे आणि महाराज माझं दैवत आहेत. कारण- ‘जाणता राजा’मुळे माझ्या नसानसांत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

“असं कित्येकदा होतं की मी एखाद्या दिग्दर्शकाला साईन करायला जातो, निर्माता म्हणून त्याला तो विषय आवडत नाही. इथेही हे इतकंच झालं.त्यांना मी सांगितलं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की बरोबर आहे की तुम्हाला भूमिका आवडली नाही. पुढे आपण नक्की काम करू. आम्ही पुढे काम करू. आमचे नाते आजही चांगलेच आहे.”

मराठी कलाकार जेव्हा हिंदी चित्रपटात काम करतो, तेव्हा त्याची किंमत कमी होते का वाढते यावर बोलताना अशोक शिंदे म्हणाले, “मला वैयक्तिक विचारल तर गेल्या ३६ वर्षात मी बघितलंय तुम्ही हिंदीत काय काम करताय? म्हणजे तुम्ही महेश मांजरेकर सरांसारखं काम करताय, मोहन जोशी सर, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर सर, विक्रम गोखले सर अशी जी काही दिग्गज मंडळी आहेत. ज्यांनी हिंदीमध्ये काम केलं आहे.त्याच्यानंतर तुमच्याबद्दलचा आदर वाढतो. दुसरं काही घडत नाही.”

“मराठी प्रेक्षकांचं मराठीत काम केल्यानंतर जितकं तुमच्यावर प्रेम असतं तेवढच असतं. फरक फक्त तुमच्या आर्थिक पैलूवर पडतो. म्हणजे जो माणूस एक रूपया घेत असेल तो १० हजारावर जातो आणि तो यशस्वी हिंदीत होतो. त्यानंतर त्याला मराठीत काम करणं अवघड का जातं? कारण त्याचे त्याचे आकडे (पैसे) निर्मात्यांना परवडत नाहीत. त्याच्या वाढलेल्या अपेक्षा, तिकडची ट्रीटमेंट असं सगळं असतं. माझ्या दृष्टीने मराठी इंडस्ट्रीमध्येसुद्धा जवळपास हिंदीएवढीच ट्रीटमेंट दिली जाते.

“सगळ्याच दृष्टीने, चॅनेल्स, मुलाखती आहेत. मराठीमधले लोक आता पैसेवाले झालेले आहेत. पूर्वीचा काळ म्हणजे आम्ही जो पाहिला होता. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतरचा तो खूप संघर्षाचा काळ होता. व्हॅनिटी नव्हत्या, मेकअप रूम नसायच्या, जुना फॅन असायचा, आऊटडोअर शूटिंगवेळी बाथरूमची सोय नसायची, कोणाच्यातरी घरी जावं लागायचं, आता सगळं बदललं आहे. आता हिंदी-मराठी सेट बघितले तर ते सारखे वाटतात. आता करोडोंचं कलेक्शनसुद्धा झालंय, करोडोंच्या फिल्म्ससुद्धा झाल्या आहेत.

पुढे अधिक बोलताना अशोक शिंदे म्हणाले, “आपल्याकडे जसे वेगवेगळ्या भूमिका करतात. माझं वैयक्तिक मत आहे. कोणीही वैयक्तिक घेऊ नये. मला असं वाटतं की तुम्ही हिरोच्या भूमिका करताय तर हिरोच्याच भूमिका करा. तुम्ही खलनायक करत असाल तर खलनायकाच्याच भूमिका करा. जर तुम्ही विनोदी कलाकार म्हणून करताय तेच करा. असं काही गरजेचं नाही की प्रत्येकांनं प्रमुख भूमिका साकारली पाहिजे. पण हिंदीत जाऊन कुठलातरी छोटासा रोल करणं मला वैयक्तिक पटत नाही. म्हणून मी अनेत वर्षात तुम्हाला कधीही हिंदी सिनेमात किंवा कुठल्याही प्रोजेक्टमध्ये दिसत नाही. “

“आठवड्यातून दोनदा मोठमोठ्या स्टु़डिओज मधून फोन असतात. मला प्रश्न पडतो की तुम्हाला हा नंबर कुठून मिळाला? ते सांगतात की डाटावरून मिळाला. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की मराठी कलाकाराची हीच ओळख राहिली का? मी त्यांना सांगतो की थोडीशी माहिती काढा की या कलाकारानं काय केलं आहे. त्याप्रमाणे दर्जा हा मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही तुमची किंमत वाढवून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो आदर मिळणार नाही.”