दिग्पाल लांजेकर यांनी अभिनय, दिग्दर्शन, लेखन यामधून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. ‘श्री शिवराज अष्टक’ या त्यांच्या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे चार ऐतिहासिक चित्रपट केले. त्यानंतर अलीकडेच पाचवा ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या दिग्पाल यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
अभिनेते, लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते शिवरायांच्या इतिहासाविषयी बोलत आहेत. या व्हिडीओत ते म्हणाले, “आपला इतिहास आहे ना, त्याच्यामध्ये चंदनपण आहे आणि कोळसा पण आहे. तुम्ही काय उगाळायचं आहे ते ठरवा. मी ठरवलंय मी चंदन उगाळणार. कारण आपल्याकडे जेवढ्या गुणवत्ता आहेत, जेवढे सदगुण आहेत, तेवढे बाहेर बघायला मिळत नाही…दाखवा मला एखादं जागतिक दर्जाचं उदाहरण. जिथे मुलाचं लग्न सोडून एक माणूस देशासाठी लढायला गेलाय..तुम्हाला दाखवता येणार नाही…”
हेही वाचा – Video: ११ महिन्यांनंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक, पाहा राहाचा व्हिडीओ
दिग्पाल यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे, “१०० टक्के दाखवता येणार नाही…. आपल्या इतिहासाची हीच तर खरी संपत्ती आहे…हेच विचार पुढच्या पिढीला समजले पाहिजेत आणि दिग्पाल दादा ते करत आहेत… जय शिवराय.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे, “दिग्पाल दादा जे काम करतायत ते खूप महान आहे…त्यांची तुलनाच नाही करू शकत… जय शिवराय, जय महाराष्ट्र..”
हेही वाचा – Video: इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; व्हिडीओ आला समोर
दरम्यान, ‘सुभेदार’ या चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १६ फेब्रुवारी २०२४ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.