अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाची जादू अजूनही बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेने केलं असून लेखनाची जबाबदारी प्रवीण तरडेंनी सांभाळली आहे. नुकतेच ‘फुलवंती’ चित्रपटाला ५० दिवस यशस्वीरित्या पूर्ण झाले. त्यानिमित्ताने १ डिसेंबरला सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रपटातील संपूर्ण टीमसह अभिनेत्री अमृता खानविलकरने विशेष हजेरी लावली होती. या पार्टीतील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात पाहायला मिळत आहे. पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा, देखण्या कलाविष्काराने सजलेला ‘फुलवंती’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळे अजूनही या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ‘फुलवंती’ चित्रपटातील गाण्यावर सध्या सोशल मीडियावर अनेक रील व्हिडीओ केले जात आहेत. अशातच चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत फुलवंती म्हणजेच प्राजक्ता माळी आणि चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर आमनेसामने आल्या. यावेळी दोघींनी जबरदस्त डान्स केला.
‘पॅनोरमा म्युझिक’च्या इन्स्टाग्राम पेजवर प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘मदनमंजिरी’ गाण्याची मूळ गायिका वैशाली माडे गाताना दिसत आहे. तर तिच्या गाण्यावर प्राजक्ता आणि अमृताने ठेका धरला आहे. दोघींचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तसंच प्राजक्ताने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे, “आमचं मदनमंजिरीचं रील राहिलंच होतं. काल नाचलोच…फुला आणि चंद्रा…संगट..”
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली होती, “‘फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या बरोबर आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.”