Phullwanti Movie Teaser : अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांच्या ‘फुलवंती’ चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून प्राजक्ताच्या सुंदर नृत्याचं कौतुक होतं आहे. आता ‘फुलवंती’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून नेटकऱ्यांनी या अलौलिक कलाकृतीचं भरभरून कौतुक केलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर शेअर केलं होतं. तेव्हापासून ‘फुलवंती’ चित्रपटाविषयी अधिक चर्चा रंगू लागली. पॅनोरमा स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘फुलवंती’ चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात पाहायला मिळणार आहे. त्याआधी चित्रपटाचा देखणा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण टीझर जबरदस्त झाला असून टीझरच्या शेवटच्या डायलॉगने सगळ्याचं लक्ष वेधलं. ‘नाचात काहींना शौक दिसतो तर काहींना कला…प्रश्न नजरेचा आहे….नजर साफ असेल तर फुलवंती तुम्हाला दुर्गा दिसेल,” हा प्राजक्ताचा डायलॉग लक्षवेधी ठरला आहे.
चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची बरोबर अशा भव्यतेने येणारा ‘फुलवंती’ हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे. पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली, देखण्या कलाविष्काराने सजलेली ‘फुलवंती’ मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरेल.
दरम्यान, ‘फुलवंती’चा टीझर नेटकऱ्यांना फार आवडला आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर ‘फुलवंती’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “चित्रपट हीट होणार त्यात काही वाद नाही”, “विलक्षण आणि मनाला फुंकर घालणारा सुंदर चित्रपट आहे…त्यामुळे उत्तम यशाची आशा आहे”, “कडक…खूपच भारी..नक्कीच सुपरहिट ठरणार”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: धनंजय पोवारची ‘ती’ कृती पाहून भारावल्या आई आणि पत्नी, ‘बिग बॉस’ना सुचवला एक नवा टास्क
दरम्यान, पॅनोरमा स्टुडिओज ‘फुलवंती’ चित्रपट सादर करत आहेत. मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे केलं आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. तसंच अविनाश-विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd