प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २८ फेब्रुवारीला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकार मंडळी सध्या जोरदार प्रमोशन करताना पाहायला मिळत आहेत.
अलीकडे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या टीमने ‘राजश्री मराठी’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी कलाकारांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से सांगितले. तसंच प्रसाद खांडेकरने प्राजक्ता माळीचा एक किस्सा सांगितल; जो सध्या चर्चेत आहे.
मुलाखतीमध्ये ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील कलाकारांना विचारण्यात आलं होतं की, तुमचं कधी इकडे आड आणि तिकडे विहीर झालं आहे का? तेव्हा प्राजक्ताने हास्यजत्रेचं चित्रीकरण आटोपून चित्रपटाच्या चित्रीकरणाला कसे पोहोचायचे. तसंच त्यांची खूप तारांबळ उडायची, याबाबत सांगितलं.
त्यानंतर प्रसाद खांडेकर म्हणाला, “२५ दिवसांच्या चित्रीकरणादरम्यान प्राजू एकदा रडली. मला हे २ वाजता पोहोचतील अपेक्षित होतं. पण त्या दिवशी चित्रीकरणाला उशीर झाला. हे सगळे चार वाजता आले. प्राजक्ता म्हणणं होतं, मी तयार आहे. माझा मेकअप झालाय. मला फक्त कॉस्ट्युम आणि हेअरस्टाइल करायची आहे. मी लगेच १० मिनिटांत तयार होईल. अर्धा तास यांची वाट बघत युनिट थांबलं होतं. खूप काही दबाव नव्हता. मला माहीत होतं ४ वाजता सीन सुरू झाला तरी ६ वाजेपर्यंत माझ्या हातात येईल. एवढा मला अंदाज होता.”
“प्राजक्ता उशीरा आल्यानंतर पम्या, सावत्या आला. जसं मी म्हटलं १०नंतर तिचा मेंदू बंद होतो ना तसा तिचा चेहरा नेपाळ्यांसारखा होता. तेव्हा ती आली आणि म्हणाली, दादा सॉरी खूप उशीर झाला. मी आपलं सहज गंमतीत म्हटलं, हा चल चल, खूप थकल्याचा अभिनय केलास. तू जा आणि मग ती रडायलाच लागली. म्हणाली, दादा मी एवढी मेहनत करून धावत-पळत आले आणि तू म्हणतोय मी थकल्याचा अभिनय करतेय. नंतर मी तिला जाऊन सॉरी म्हणालो,” असं प्रसाद खांडेकर म्हणाला.
दरम्यान, ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात अभिनेते निखिल रत्नपारखी, अभिजीत चव्हाण, चेतना भट्ट, नम्रता संभेराव, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात नम्रता संभेरावचा कॅमिओ आहे.