‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असो वा चित्रपटातील भूमिका किंवा नृत्य अशा विविध माध्यमांतून अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. याबरोबरच प्राजक्ता माळी अनेकदा तिच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असते. आता नुकत्याच एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने महिलांनी आर्थिक सक्षम असणं का गरजेचे आहे, यावर वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पन्नाशीत गेल्यानंतरही तुम्ही…

प्राजक्ता माळीने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. महिलांना सल्ला देताना अभिनेत्रीने म्हटले, “जे तुम्हाला करावसं वाटतंय त्या गोष्टीला जरूर न्याय द्या. मार्ग निघतील, मार्ग काढा आणि महिला करू शकत नाही, अशी कुठलीही गोष्ट नाहीये. महिला अष्ठावधीनी असते, ती एका वेळी आठ-आठ गोष्टी करू शकते. त्यामुळे हा प्रश्नच नाही की जमेल की नाही. संसार, वय, पोरं सगळं बाजूला ठेऊनसुद्धा तुम्ही तुमची स्वप्नं साकार करू शकता आणि वय तर विषयच बाजूला ठेवा. वय वैगेरे असं काही नसतं. मात्र, प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य महत्त्वाचे आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर पन्नाशीत गेल्यानंतरही तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकता आणि करायलाच पाहिजे. तुम्हाला आतून ऊर्मी येतेय, तर तुम्ही ते केलंच पाहिजे.”

पुढे अभिनेत्रीने म्हटले, “सगळ्या महिलांनी आर्थिक स्वावलंबी असलं पाहिजे, या मताची मी आहे. कारण- ती गोष्ट असल्यानंतर तुम्हाला आपसूक घरामध्ये आदर मिळतो. तुमच्या मताला महत्त्व असते. तुम्ही इतरांवर कमी अवलंबून असता, तुमच्याच जीवाला ते बरं वाटतं, तेवढी गोष्ट असण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा”, असे म्हणत अभिनेत्रीने महिलांनी आर्थिक सक्षम असणे का गरजेचे आहे हे सांगितले आहे.

अभिनेत्री ‘फुलवंती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाची ती निर्माती होती, याबरोबरच ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातून अभिनेत्रीने अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यानेही प्रेक्षकांचे मन जिंकले. आता ती पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात प्राजक्तासह अभिनेता स्वप्नील जोशी, वनिता खरात, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रार्थना बेहेरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.