परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाला. खरंतर, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटातील ‘नाच गं घुमा’ हे शीर्षक गीत गेली एक ते दोन महिने सर्वत्र व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या शेवटी सगळ्या अभिनेत्री या शीर्षक गीतावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, याच गाण्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
चित्रपटाचा भाग नसूनही प्राजक्ता माळी ‘नाच गं घुमा’ या गाण्यात काय करतेय, ती इथे कशी काय? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आणि या सगळ्याचा खुलासा प्राजक्ताने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओद्वारे केला आहे.
‘नाच गं घुमा’ चित्रपटाने महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी २.१३ कोटींचा व्यवसाय करत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मराठी कलाविश्वातील सगळेच कलाकार या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळीचं एका अनोख्या पद्धतीने या चित्रपटाशी नाव जोडलं गेलं आहे.
हेही वाचा : प्रसाद ओकच्या बायकोचा वाढदिवस! अमृता खानविलकरची मंजिरीसाठी खास पोस्ट, ‘असं’ केलं सेलिब्रेशन
प्राजक्ता लिहिते, “माझ्या ‘प्राजक्तराजसाज’ ब्रॅण्डची पहिली पार्टनरशिप आणि ते ही ‘नाच गं घुमा’सारख्या चित्रपटाबरोबर अत्यंत दर्जेदार कलाकृतीबरोबर ‘प्राजक्तराज’चं नाव जोडलं गेलं याचा आत्यंतिक आनंद, समाधान आणि अभिमान आहे. व्हिडीओमधील माझ्या आवाजावरुन हे तुम्हाला सर्वांना जाणवतच असेलच…ज्यांनी लोकांनी काल चित्रपट पाहिला आणि ज्यांना शेवटी मी नाचताना दिसले त्यांना ही इथे का? याबद्दल प्रश्न पडले होते त्याचं हे उत्तर…मधुगंधा कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी तुमचे खूप खूप आभार!”
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाला एकूण सहा सर्जनशील निर्माते लाभले आहेत. स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, परेश मोकाशी, तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाती निर्मिती केली आहे.