‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). अभिनेत्रीने या मालिकेनंतर अनेक मालिका-चित्रपटांत काम केले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. अभिनेत्री नुकतीच फुलवंती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात प्राजक्ता माळी अभिनेता गश्मीर महाजनीबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. अभिनय, नृत्य अशा सगळ्याच बाबतीत अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकू घेतली आहेत. आता एका मुलाखतीत प्राजक्ताने फुलवंती या चित्रपटामुळे घडलेल्या कोणत्या गोष्टींसाठी ती ऋणी राहील, याबाबत वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अथपासून इतिपर्यंत गोष्टी कळल्या

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘राजश्री मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीला विचारले की, ‘फुलवंती’मुळे घडलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यासाठी तू कायम ऋणी राहशील? त्यावर बोलताना प्राजक्ताने म्हटले, “फुलवंती हा टायटल रोल मला मिळाला. मी १२-१३ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे; पण तशी भूमिका मला मिळाली नव्हती. त्यामुळे ते ‘फुलवंती’मुळे घडलं. या चित्रपटामुळे माझं नृत्यकौशल्य समोर आलं. बऱ्याच लोकांनी माझे बरेच चित्रपट पाहिलेले नाहीत; परंतु हा चित्रपट बहुतांश लोकांनी पाहिला. त्यामुळे माझं अभिनयकौशल्यही लोकांनी पाहिलं. माझं टॅलेंट दिसलं. या चित्रपटामुळे मला निर्माती म्हणून टॅग मिळाला. निर्माती म्हणून पहिला प्रोजेक्ट आणि तोही ‘फुलवंती’चा मिळाला, त्यामुळे मी देवाची ऋणी राहीन.”

त्यावर अधिक बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मी सगळंच छान आहे, असं गोष्टींकडे, माणसांकडे बघते. कमतरता बघत नाही. मी कोणालाही जज करत नाही. पण, जज करणं गरजेचं पडतं, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींबरोबर काम करता. जगरहाटी अजून थोड्या वरच्या पायरीवर आहे हे या प्रोजेक्टमधून कळलं. मला फिल्म मेकिंग प्रोसेस खूप जवळून कळली. मी कधीच पोस्ट प्रॉडक्शनचा भाग नव्हते. आपापलं डबिंग करा, घरी जा. पण, या चित्रपटात मी एडिट टेबलपासून ते डीआय, डबिंग सगळ्या प्रोसीजरमध्ये होते आणि त्यामुळे मला अथपासून इतिपर्यंत गोष्टी कळल्या. ‘फुलवंती’ चित्रपटामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”

कदाचित मी आता पन्नाशीची असते, तर…

‘फुलवंती’ चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल बोलताना प्राजक्ता माळीने म्हटले, “मी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. २०२३ मध्ये ‘फुलवंती’मुळे मी बाहेरचा एकही चित्रपट केला नाही. मी सहा-सात चित्रपटांना नाही म्हटले. का तर कधीही ‘फुलवंती’साठी पैसे येतील आणि प्रोजेक्ट करायला लागेल. मी लंडनच्या फिल्म्स केल्या नाहीत. मी २०२३ मध्ये एकही चित्रपट शूट केला नाही. मी माझ्या आयुष्यातील दोन वर्षे ‘फुलवंती’लाच बहाल केली. मी सात-आठ महिने एकही कार्यक्रम केला नव्हता. ‘फुलवंती’ चालू असताना मी पाच महिने पुण्याला माझ्या घरीसुद्धा गेले नाही. अथक मेहनत, सातत्य व संयम या गोष्टी होत्या. किती छळलं मला लोकांनी. काय होतं ना मी वयानं लहान आहे, मुलगी आहे. याबरोबरच, तुम्ही मोठ्या होताय ना आता.”

“सुरुवातीला ऑन बोर्ड येताना लोकांना वाटतं की, इतका चांगला चित्रपट आहे. मी करणार, माझं नाव लागणार. नंतर त्यांना कळतं की, माझं नाव लागेल, पण हिचंसु्द्धा नाव लागेल. ही मुलगी आपल्याला मागे टाकून पुढे जाणार, याचा बहुतांश जणांना त्रास झाला. जे मला कळत होतं; पण मी बोलू शकत नव्हते. कारण- ते माझ्याच टीमचा भाग होते. मी त्यांची म्होरक्या होते. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे शेवटपर्यंत असलं पाहिजे, हे जाणून मला गोडच बोलायला लागायचं. त्यामुळे जास्त त्रास झाला. कदाचित मी आता पन्नाशीची असते, तर मला कमी त्रास झाला असता. माझ्या पन्नाशीला मला कमी त्रास होईल. तेव्हा मी घोषित बॉस असेन. आता मी बॉस असणं खूप जणांना खुपलं. माझं म्हणणं शेवटचं म्हणणं आहे, हे खुपायचं. सगळं गोल-गोल फिरून, प्राजक्ता काय म्हणते, ती ठरवेल हे जेव्हा समोरचा बोलायचा तेव्हा लोकांना आवडायचं.

२०२५ चा माझा उद्देश…

२०२५ साठी काय प्लॅन आहेत, असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना प्राजक्ता माळीने म्हटले, “मी निर्माती होणं हे माझं स्वप्न नव्हतं. हे मी कधीच प्लॅन केलं नव्हतं. माझ्या वाट्याला माझं टॅलेंट दाखवलं जाईल, असं प्रोजेक्ट आलं नाही म्हणून मला हे करावं लागलं. तर, मला असं वाटतं की, माझं टॅलेन्ट दाखवलंय. त्यामुळे आता माझ्याकडे चांगले प्रोजेक्ट यावेत. मला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत. माझा पहिल्यापासून हा उद्देश राहिला आहे की, मी पैसा कमवेन तो माझ्या आवडत्या गोष्टींमधून कमवेन. मग दागिने, अभिनय, मॉडेलिंग जे असेल, ते मी माझ्या कष्टातून पैसा कमवेल. आता २०२५ चा माझा उद्देश हा आहे की, मी जो पैसा कमवेन, तो अभिनयातूनच कमवेन. फक्त अभिनयातून पैसे मिळावेत इतके अभिनयाचे प्रोजेक्ट मला मिळावेत. मला स्वत:चं प्रोड्युस करायचंच आहे; पण मला इतर भाषांमध्येसुद्धा प्रयत्न करायचे आहेत. मला वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचं आहे. मला वेगवेगळ्या पद्धतीच्या जॉनर्समध्ये काम करायचंय. मला अभिनय क्षेत्रात खूप काम करायचं आहे. असंच माझं २०२५ हे वर्ष असावं, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे.

हेही वाचा: महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”

दरम्यान, अभिनेत्री आता कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali on experience of working in phullwanti says a lot of people are jealous reveals reason also shares plans of 2025 nsp