Prajaka Mali Poetry : अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘फुलवंती’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण केले असून ओटीटी माध्यमावरही हा सिनेमा प्रेक्षकांची पसंती मिळवतोय. प्राजक्ता माळी अभिनेत्री व निवेदिका म्हणून ओळखली जाते. याशिवाय ती कविताही करते. प्राजक्ताने नुकतीच तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहातील एक कविता एका साहित्य पुरस्कार सोहळ्यात ऐकवली. या कवितेचे नाव ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असे आहे. याचा व्हिडीओ प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून नवोदित कवयित्री म्हणून ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे. प्राजक्ता माळीच्या ‘प्राजक्तप्रभा’ या पहिल्या कवितासंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ताने तिची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ एक कविता सादर केली.
प्राजक्ता माळीची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ कविता
पुणे-मुंबई-पुणे नाही आता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असा प्रवास करतो आम्ही…
जरी वाढलो पुण्यात, तरी कामानिमित्त मुंबईला राहतो हे अभिमानानं सांगतो आम्ही…
पुणं कठोर, कर्तव्यदक्ष… चुकल्यास कान पिळणाऱ्या बापासारखं…
तर मुंबई…सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आम्हांस…
आम्हाला सतत धावणारी, उत्साहानं भारलेली मुंबई आवडतेच…
आणि निवांत, मोकळढाकळं पुणंही खास…
चालत असतानाही, थांबून पत्ता सांगणाऱ्या ‘Helpfull’ मुंबईकरांचं कौतुक…
आणि spoon feeding न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुणेकरांचंही रास्त…कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर…
आणि ज्या पोटासाठी सगळी उठाठेव चाललीय तिकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही बरोबर…
कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही १-४ झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित Adjust होतो आम्ही…मुंबईचं ट्राफिक आणि पुणेरी पाट्या अशा दोन्हीकडच्या कोपरखळ्या गोड हसत पचवतो आम्ही…
मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ Diet बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही…
अहो, एवढंच नाही…तर ह्या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या Expresswayच्याही प्रेमात आहोत आम्ही…एक शहर Extra self respect शिकवतं.. दुसरं Extra flexibility
एकीकडे डोंगरमाथा दुसरीकडे समुद्र खाडी…
खरं तर नशीबवान आहोत, अशा दोन्ही शहरांच्या सानिध्यात वाढतोय…
सांस्कृतिक-आर्थिक अशा सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होतोय…
प्राजक्ता माळीची ही मुंबई आणि पुण्यावरची कविता चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काही सेलिब्रिटींनीही प्राजक्ताच्या या कवितेला दाद दिली आहे. प्राजक्ताच्या एका चाहतीने “खुप सुंदर व अप्रतिम कविता” असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. तर तिच्या दुसऱ्या एका चाहत्याने “अप्रतिम कविता…आणि कवितेचे उत्तम आणि प्रभावी सादरीकरण.” अशी कमेंट केली आहे.