प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता तिच्या कामाबरोबर तिच्या व्यवसायामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलत असते. आता प्राजक्ताने तिचे लग्नाबाबत काय विचार आहेत, यावर भाष्य केलं आहे. तसेच तिने पाच वर्षापूर्वीच्या एका रिलेशनशिपबद्दलही खुलासा केला.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळीला लग्नाबद्दल तिचे विचार काय, असं विचारण्यात आलं. उत्तर देत ती म्हणाली, “डोक्याची मंडई होणार असेल तर लग्न नको. कारण मानसिक शांतता हिच माझी आयुष्यभरासाठी प्राथमिकता आहे. एक जोडीदार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकतो. तुमचं रोजचं जगणं, तुमचं भविष्य, तुमची आर्थिक गणितं, तुमचे मानसिक आरोग्य, तुमचे आरोग्य या सगळ्या गोष्टी. लग्न ही खूप मोठी जोखीम आहे.”
पुढे प्राजक्ता म्हणाली, “काहींना शारिरीक, भावनिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक गरज असतात, त्यांच्यासाठी लग्न ही गोष्ट खूप सोपी आहे. अध्यात्मामुळे माझ्या या गरजा खूप कमी झाल्या आहेत. त्यामुळे जर या गरजाच संपल्या तर कशाच्या जीवावर ते नातं तरणार? फक्त प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा. पण याची गॅरंटी या कलियुगात कोण देणार. नातं खरं असेल तरंच ते टिकेल. या गोष्टी मी आईला समजवतेय आणि तिलाही कळतंय.”
नवीन संसार अन् मालिकेचं शूट कसं सांभाळतेय सुरुची अडारकर; म्हणाली, “माझा नवरा पियुष…”
प्राजक्ताने एक जुना किस्सा सांगितला. “मी मधेमधे प्रेमात पडते, पण नंतर मला कळतं की हा शेवटपर्यंत नसणार, मग मी सांगते की ऐक मित्रा, सगळं छान आहे पण हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू घरी जा. (हसते) आपण थांबूया. हे मी पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं. तू खोटं बोलतोस माझ्याशी, मी तुला पकडलं आहे, हे त्याचे पुरावे आहेत. रितसर जय महाराष्ट्र करण्यात आलाय त्याला. कारण तो सतत खोटं बोलत होता आणि ते मान्यही करत नव्हता. तुमच्यामध्ये खरं बोलण्याची हिंमत पाहिजे, कारण तीच सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. मी चुकलो हे तरी मान्य करायला हवं. त्यासाठी माफी मागून मार्ग काढायला हवा, पण नाही. सारखं खोटं बोलायचं. जो खोटं बोलतो ना तो सर्वात आधी बाद होतो,” असं प्राजक्ता म्हणाली.