Prajakta Mali : सहज सुंदर अभिनय आणि आपल्या निखळ सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखलं जातं. शूटिंग, इतर कार्यक्रम, व्यग्र शेड्यूल या गोष्टी सांभाळून प्राजक्ता आपल्या त्वचेची काळजी कशी घेते, डाएटसाठी काय-काय फॉलो करते याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
रोजच्या दिनचर्येविषयी बोलताना प्राजक्ता माळी ‘लोकमत सखी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते. एकतर उत्तम खाणं आणि दुसरं उत्तम दिनचर्या हे दोन्ही फॉलो केलंच पाहिजे. तुम्ही जे अन्न खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्ही मैदा जास्त प्रमाणात खाताय तर, तुम्ही मैद्यासारखे होणारच आहात. त्यामुळे शिळं, पॅकेज फूड वगैरे खाऊ नका. जेवढं ताजं अन्न तुम्ही खाल तेवढा तजेलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर येईल. शक्य तेवढं लवकर झोपून, पहाटे लवकर उठणं गरजेचं आहे. रात्री २-३ वाजेपर्यंत जागून तुम्ही सुंदर दिसाल असं तुम्हाला वाटत असेल तर, ते शक्य नाही. या सगळ्यात व्यायाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.”
प्राजक्ता पुढे म्हणाली, “आठवड्यातून तीन वेळा तरी व्यायाम केला पाहिजे. मी स्वत: योग करते… मोकळ्या हवेत योग करणं अतिशय फायदेशीर ठरतं, एसीमध्ये करू नका. या गोष्टी केल्या तर, सौंदर्यप्रसाधनं दुय्यम वाटू लागतात. तुमच्या पोटात जे जातं, तेच सर्वांगावर रिफ्लेक्ट करतं. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी चेहरा स्वच्छ धुवा, बाहेरून आल्यावर अंघोळ करणं खूप महत्त्वाचं आहे. झोपायच्या आधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. दिवसाही असंच…चेहरा क्लीन करून त्यावर टोनर, सन्स्क्रीन, मॉइश्चराइजर वगैरे लावा. शूटिंग नसेल तर, मी अजिबात मेकअप करत नाही…नेहमी कमीत-कमी मेकअप करणं याकडे माझं लक्ष असतं.”
प्राजक्ता माळी डाएटविषयी काय म्हणाली?
यानंतर डाएटविषयी सांगताना प्राजक्ता म्हणाली, “डाएट प्लॅनविषयी सांगायचं झालं, तर मी शाकाहारी आहे. मी मांसाहार करणाऱ्या लोकांच्या विरोधात नाही त्यामुळे माझ्यावर चिडू नका पण, एक उदाहरण सांगेन. आपल्या शरीरात नॉनव्हेज पचण्यासाठी ७२ तास लागतात. प्राण्यांची पचनसंस्था वेगळी असते आणि माणसांची वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही. बरं हे मी सांगत नाहीये…यावर अनेक डॉक्युमेंट्रीज सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. मी आधी नॉनव्हेज खायचे, मग त्यानंतर मी सोडलं.”
“कोणतीही गोष्ट खाल्ल्यावर मध्ये दोन तासांचा गॅप पाहिजे. २ वाजता जेवलात तर, पुढे चार वाजेपर्यंत काहीच खायचं नाही. मधल्या वेळेत पाणी प्या पण, खाऊ नकात. मी फरसाण खाते हे सगळीकडे व्हायरल झालंय, पण या गोष्टी कधी-कधी खायच्या. रोज हे अंगवळणी लावून घ्यायचं नाही. एखाद्या लग्नात गेल्यावर मी खूप जेवले तर दुसऱ्यादिवशी लंघन करते. लंघन म्हणजे उपवास…आदल्यादिवशी खूप खाल्लं असेल तर, दुसऱ्या दिवशी मी फक्त फळं खाऊन लंघन करते.” असं प्राजक्ता माळीने सांगितलं.