महाशिवरात्रीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिराच्या प्रांगणात मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा प्राजक्ता माळी नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्याचं सादरीकरण करणार होती. मात्र प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला विरोध करण्यात येत होता. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी अभिनेत्रीच्या सादरीकरणाला विरोध दर्शवला होता.
“धार्मिक कार्यक्रम व्हावेत. शास्त्रीय नृत्य, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण, सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केला आहे, हे सगळं चुकीचं घडत आहे” असं मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं मतं होतं. यानंतर प्राजक्ता माळीने स्वत: व्हिडीओ शेअर करत यावर स्पष्टीकरण दिलं होतं.
“देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतं, सगळे भक्त असतात आणि त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून, माझी सेवा नटराजांच्या चरणी अर्पण करणार आहे.” असं प्राजक्ता म्हणाली होती. माजी विश्वस्तांच्या आक्षेपानंतरही महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेणार होते. पण, आता स्वत: प्राजक्ताने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राजक्ता माळीने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे. अभिनेत्री म्हणाली, “पहिल्यापासून या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं. कारण, मंदिराचं प्रांगण, तेथील क्षेत्रफळ, तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी सुद्धा सोशल मीडियावर या कार्यक्रमाबाबत अजिबात माहिती दिली नव्हती आणि प्रसिद्धी सुद्धा दिली नव्हती. पण, काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली त्यामुळे आता अवास्थव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्याचमुळे मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून हा निर्णय घेतेय. कमिंटमेंट आहे त्यामुळे कार्यक्रम होईल. माझे सहकलाकार तो कार्यक्रम सादर करतील पण माझ्याशिवाय… अर्थातच यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे पण, वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला सर्वात महत्त्वाची वाटली. त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय आहे. अर्थातच जिथे भाव असतो तिथे देव असतो यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही बसून आराधना केली तरी ती देवापर्यंत पोहोचणारच आहे. तिथे कोणाचाही हिरमोड होऊ नये आणि कोणाच्याही मनात कोणतीही शंका उत्पन्न होऊ नये म्हणून मी हा व्हिडीओ बनवतेय. हर हर महादेव”
दरम्यान, माजी विश्वस्त ललिता शिंदे यांच्या विरोधानंतर पुरातत्व विभागाने सुद्धा त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवलं होतं. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इशारा एएसआयने दिला होता. त्याचप्रमाणे कार्यक्रमांपूर्वी एएसआय दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश त्यांनी देवस्थानला दिले होते.