प्रार्थना बेहेरे सध्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीने नुकतीच सुमन म्युझिक मराठीच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी प्रार्थनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

“एक मिश्किल प्रश्न आहे. आम्ही असं ऐकलंय की, तू साधारण १५-२० मुलांची आई आहेस आणि तू हे सर्वांपासून लपवून ठेवलंय…” असा प्रश्न प्रार्थना बेहेरेला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “यात मिश्किल असं काही नाही कारण, हेच खरं आहे. मी यापूर्वी सुद्धा एका मुलाखतीत सांगितलं होतं…मला १५-२० मुलं आहेत आणि यातला माझा एक मुलगा तर लग्नाआधीचा होता. त्याचं नाव आहे गब्बर. जो माझा सर्वात मोठा श्वान आहे. यातले सात श्वान आमच्या घरी आहेत. त्यांच्याशिवाय बाहेर म्हणजे फार्महाऊसवर सुद्धा अनेक श्वान आहेत. आमच्याकडे गायी सुद्धा आहेत.”

प्रार्थना पुढे म्हणाली, “आमच्या फार्महाऊसवर श्वान आणि गायींशिवाय १० ते १२ घोडे आहेत. त्यामुळे ही सगळी आमची मुलंच आहेत. अर्थात त्यांचा सांभाळ करणं कठीण आहेच पण, आपली इच्छा असते तेव्हा सगळं शक्य होतं. कारण, त्या प्राण्यांना फक्त आपल्याकडून प्रेम हवंय. त्यामुळे मी आणि माझ्या नवऱ्याने ठरवलंय की, आता ही मुलं आपल्यासाठी खूप आहेत. आपल्यासाठी आता मनुष्याची मुलं नको…त्याच मुलांचा आम्ही सांभाळ करणार आहे.”

“माझा नवरा या आमच्या सगळ्या मुलांच्या बाबतीत खूप जास्त पझेसिव्ह आहे. त्याच्या मनात प्राणीप्रेम पहिल्यापासून आहे. मी सुद्धा लहानपणापासून प्राणीप्रेमी होते पण, त्याच्याएवढं माझं नव्हतं. पण, आता यांच्या घरी आल्यापासून मी सुद्धा या प्राण्यांशिवाय राहू शकत नाही. प्राण्यांकडून नेहमी आपल्याला नि:स्वार्थ प्रेम मिळतं. अभिचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आमच्याकडे या प्राण्यांचा सांभाळ करणारी विशेष लोक आहेत. पण, तरीही आम्ही दोघं त्यांच्याकडे खूप जास्त लक्ष देतो. कारण, जसं माणसांना प्रेम लागतं तशीच त्या प्राण्यांना सुद्धा प्रेमाची गरज भासते.” असं प्रार्थनाने सांगितलं.

दरम्यान, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रार्थनाने २०१७ मध्ये अभिषेक जावकरशी लग्न केलं. अभिषेक जावकर हा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखला जातो. प्रार्थनाच्या जवळच्या मैत्रिणीच्या आईने अभिषेकचं स्थळ प्रार्थनाला सुचवलं होतं. ती देखील अरेंज मॅरेजसाठी तयार झाली आणि अभिषेकला भेटण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघंही १४ नोव्हेंबर २०१७ रोजी विवाहबंधनात अडकले.