छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमाला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे उपस्थित राहिली होती. या कार्यक्रमात अभिनेत्रीने महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. यानंतर आता प्रार्थनाने यासंदर्भात व्हिडीओ शेअर करून घडल्याप्रकाराबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे.
लातूरमध्ये एका मॉलच्या उद्घाटन सोहळ्याला प्रार्थनाने सोमवारी हजेरी लावली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना तिने महाराजांचा चार ते पाचवेळा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. यानंतर अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लातूरमध्ये लावण्यात आलेले बॅनर्स तरुणांनी संताप व्यक्त करत फाडले. घडल्या प्रकाराबद्दल समजताच प्रार्थनाने व्हिडीओ शेअर करत शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
हेही वाचा : Video: आली समीप लग्नघटिका! जॅकी-रकुलच्या लग्नाला पोहोचली देशमुखांची धाकटी सून, पापाराझींची केली विचारपूस
प्रार्थना या व्हिडीओमध्ये म्हणते, “नमस्कार मी प्रार्थना बेहेरे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा! आज मी किसान मॉलच्या उद्घाटनासाठी लातूरमध्ये उदगीरला आले होते. त्याठिकाणी माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी काही चुकीचं बोलले असेन, तर यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. माझा असा कोणताही हेतू नव्हता, माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत एकदा सांगते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा…छत्रपती शिवाजी महाराज की जय”
हेही वाचा : “एवढा मोठा घोडा झालाय अन्…”, नुपूरचे ‘ते’ शब्द ऐकताच आई झाडू घेऊन धावली, पाहा आमिर खानच्या जावयाचा Video
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर प्रार्थना बेहेरे लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एका नवीन चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.