Marathi Actress Prarthana Behere : ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून प्रार्थना बेहेरेने कलाविश्लात पदार्पण केलं. या मालिकेमुळे तिला घराघरांत ओळख मिळाली. काही वर्षे हिंदीत काम केल्यावर प्रार्थनाने आपली पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळवली. ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’, ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’ असे बरेच गाजलेले सिनेमे प्रार्थनाने केले. गेली अनेक वर्षे ती या इंडस्ट्रीत काम करतेय. मात्र, इंडस्ट्रीत काम करताना केवळ अभिनयच नव्हे तर प्रत्येक अभिनेत्रीला आपला फिटनेस देखील तेवढाच जपावा लागतो.
आता वयाच्या चाळीशीत प्रार्थनाचा फिटनेस मंत्रा नेमका काय आहे? त्वचा कायम तजेलदार राहावी यासाठी अभिनेत्री काय-काय करते, आपल्या त्वचेची कशी काळजी घेते याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
प्रार्थनाने अलीकडेच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी प्रार्थना स्किन केअर रुटिनविषयी म्हणाली, “मी मध्यंतरी माझ्या स्कीनसाठी असं काहीच विशेष करायचे नाही. पण, आता या सगळ्या गोष्टी मी पुन्हा सुरू केल्या आहेत. रात्री सगळा मेकअप काढून… मी नाईट क्रीम लावून झोपते. मधल्या काळात काय झालं…’अरे माझी स्किन खूप चांगलीय, काही नाही होत’ असा विचार करून मी तशीच झोपायचे, थोडा आळशीपणा केला होता. त्याच्यामुळे मला त्रास झाला. त्यात मला थायरॉईड आहे यामुळे स्किन लगेच ड्राय होते. तेव्हापासून मग स्किनकेअर रुटिन बदललं. आता डे क्रीम ( सकाळी बाहेर पडताना, मेकअप करण्याआधी ) आणि नाईट क्रीम दोन्ही लावायचंच असं मी ठरवलंय, यामुळे नक्की फायदा होतो.”
फिट राहण्यासाठी प्रार्थना काय करते? याचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “मी आनंदी राहते. तुम्ही जेव्हा खूश असता, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देता आणि जेव्हा तुम्ही थोडे मानसिक तणावात असता किंवा दु:खी असता तेव्हा मग आपण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आनंदी राहा, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही.”
याशिवाय “कोणत्या अभिनेत्रीच्या वॉर्डरोबवर ( फॅशन, स्टाइल, कपडे इ.) तुझी नजर आहे?” याबद्दल प्रार्थना म्हणाली, “बॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण आणि मराठीत विचाराल तर सई ताम्हणकर. सई जे काही कपडे घालते, तिची स्टाइल, तिचे सगळे कपडे मला आवडतात म्हणजे तिच्यावर सगळ्याच गोष्टी फार सुंदर दिसतात.”
दरम्यान, प्रार्थना बेहेरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ सिनेमात झळकली आहे. यामध्ये प्रार्थनासह हास्यजत्रेतील कलाकार, स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी अशा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे.