लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने काही महिन्यांपूर्वी मुंबईत आलिशान घर खरेदी करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. मनोरंजनसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करून त्याने आजच्या घडीला मोठं यश मिळवलं आहे. प्रसाद-मंजिरीच्या नव्या घराला नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांनी भेट दिली. याचे बरेच फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हास्यजत्रेची संपूर्ण टीम प्रसाद ओकच्या घरी पोहोचली होती. अभिनेत्याने या सगळ्यांना नव्या घराची पार्टी दिली. नम्रता संभेराव, रोहित माने, निखिल बने, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, समीर चौघुले असे सगळेच कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते. या सगळ्या कलाकारांनी प्रसादच्या घरातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याच्या घराची सुंदर झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका का सोडली? कारण सांगत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
प्रसाद खांडेकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्याच्या घराचं प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे. संपूर्ण घरात प्रसादने लाकडी फर्निचर ( वूडन डोअर अँड विंडो) करून घेतलं आहे. आकर्षक बैठक व्यवस्था, हटके नेमप्लेट आणि प्रवेशद्वारावर स्वागतासाठी लावण्यात आलेल्या दोन मराठी लूक केलेल्या बाहुल्या या सगळ्याच गोष्टी लक्ष वेधून घेतात.
हेही वाचा : चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २’साठी स्वप्नील जोशी, सचिन पिळगांवकर निघाले कोकणात, पाहा फोटो…
प्रसाद-मंजिरेने सजावट करताना संपूर्ण घराला मराठमोळा टच दिला आहे. सध्या अभिनेत्याच्या या नव्या घरावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याच्या या नव्या घराला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील खास भेट दिली होती.