‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता धर्मवीरच्या दुसर्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला २७ डिसेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली होती. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकार व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ‘धर्मवीर’च्या पुढील भागाची घोषणा चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे.
हेही वाचा>> “मराठी सिनेमांचं वेड लागू दे रे महाराजा”, संतोष जुवेकरचा व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा>> “प्लीज तुनिषाला वाचवा” असं म्हणत रुग्णालयात शीझान खान रडत होता, डॉक्टरांचा खुलासा
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवले जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. २०२४ मध्ये धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेचं फार कौतुक झालं होतं. तर क्षितीश दाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत होता.